राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:40 AM2019-04-15T11:40:46+5:302019-04-15T11:42:42+5:30
राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चार हजार टँकरच्या मदतीने गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्या उघडल्या जात आहे. पुढील महिन्यात या छावण्याची संख्या वाढणार आहे.
पाणीटंचाईची सर्वाधिक भीषण स्थिती औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागाची आहे. या भागामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने जलाशयाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. राज्यात उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत वर चढला आहे. चंद्रपूरमध्ये हा पारा वाढला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती अशीच आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. जनजीवनही प्रभावित झाले आहे.
२४ जिल्ह्यामध्ये ही भीषण स्थिती आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १६२६ गावे आणि ५७० वाड्यामध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी दोन हजार १८५ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.
नाशिकमधील ७६३ गावे, ३०३९ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ५०६ गावे, ३३६२ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकणातील ६८ गावे आणि १८८ वाड्यांना ५७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. अमरावती विभागातील १४६ गावांना १५३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागातील एका गावात एका टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यात चार टँकर
यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ५ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासानाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील चार गावांमध्ये चार टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. १२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पुढील महिन्यात ही संख्या वाढण्याचा धोका आहे.
चाऱ्याअभावी जनावरे विक्रीला
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरांना लागणारा उपयुक्त चाराच उपलब्ध नाही. यामुळे छावण्या उघडाव्या लागतील आणि चारा विकत घ्यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत.