पाणीटंचाईचे संकट गडद
By admin | Published: January 21, 2016 02:21 AM2016-01-21T02:21:38+5:302016-01-21T02:21:38+5:30
यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.
उमरखेड : यंदा झापलेला अपुरा पाऊस आणि आटलेल्या पैनगंगेमुळे उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पैनगंगा नदीतीरावरील गावांमध्ये तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ यंदा हिवाळ्यातच आली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी नदीतीरावरील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने दखल घेतली नाही.
उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा नदी यंदा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे नदीतीरावरील सुमारे ४० गावांमध्ये पाणीसंकट निर्माण झाले आहे. या नदीतीरावर अनेक गावच्या नळयोजना आहे. नळयोजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीतच नाही तर टाकीत पाणी कोठून येणार, असा प्रश्न पडला आहे. तसेच भारनियमनही टाकीपर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळा ठरत आहे. अशा स्थितीत नदी तीरावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नदीतीरावरील नागरिकांसारखीच स्थिती बंदी भागातीलही आहे. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. तसेच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
उमरखेड पंचायत समितीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हा निधी नेमका कशावर खर्च होतो, हाही संशोधनाचा विषय आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रशासन एकीकडे गावात जलस्त्रोत वाढल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे तीच गावे पाणीटंचाईच्या कृती आराखड्यातही दिसत आहे. यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ येणारा निधी कसा खर्च होतो, हे दिसून येते.
उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडले तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईवर मात होवू शकते. परंतु प्रशासन अद्यापही इसापूर धरणाचे पाणी सोडायला तयार नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे.
उमरखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील काही भागातही पाणीटंचाई जाणवत आहे. जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून मार्च, एप्रिल महिन्यात काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाई निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी कोणताही पुढाकार घेताना दिसत नाही. नागरिक आंदोलनाच्या तयारीत असले तरी लोकप्रतिनिधी मात्र त्यावर बोलायला तयार नाही. दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. खास करून नदीतीरावरील नागरिक पाणीटंचाईने हैराण असतात. परंतु त्यांच्यासाठी कायमस्वरूपी योजना केली जात नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)