दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:03 PM2017-11-06T22:03:07+5:302017-11-06T22:03:37+5:30

तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही.

Water shortage in Darwha taluka | दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई

दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : ५९ गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही. त्यामुळे प्रकल्पांची वाईट अवस्था आहे. अडाणसह नदी-नाले कोरडे पडले असून शहर व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
जून, जुलै या महत्वाच्या महिन्यात ३२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर २१७ मिमीची भर पडली तरी पाऊस तुरळक पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हसबी प्रकल्पात केवळ २५ टक्केच जलसाठा होऊ शकला. प्रकल्पाचे पाणी नदीत न सोडल्याने अडाण कोरडी पडली. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. त्याच बरोबर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे तलाव, सार्वजनिक, खासगी विहिरी, आटल्यामुळे आतापासूनच टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दारव्हा तालुक्यात यावर्षी ५३७ मिमी पावसाची नोंद झाली. परंतु एकही पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा पडला नाही. जून, जुलै सारख्या महिन्यात तुषार सिंचनासारख्या धारा बरसल्या. एकही झळ अनुभवता आली नाही. यावर्षी दमदार पावसाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी एकाही प्रकल्प, तलावांना पातळी गाठता आली नाही. सर्वात मोठ्या म्हसनी प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. कुंभारकिन्ही, गोखी, अंतरगाव या प्रकल्पाचीसुद्धा वाईट अवस्था आहे. सिंचन, पाझर तलाव, नदी, नाले कोरडे पडले आहे. सार्वजनिक खासगी विहिरी, हँडपंप आदींची पातळी कमी झाल्याने तळ गाठला आहे. अर्ध्याअधिक शहराला पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची पेकर्डा पाणीपुरवठा योजना अडाण नदी अटल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे अरुणावती प्रकल्पावरून नवीन वसाहत, रेल्वे स्टेशन परिसर, मुंगसाजी मंदिर रोड, उत्तरेश्वर चौक, बाराभाई मोहल्ला, मल्लिकार्जुन मंदिर रोड तर कुपटी योजनेवरून नातूवाडी, राम मंदिर परिसर, गणपती मंदिर, तेलीपुरा, अंबादेवी मंदिर परिसर, टिळकवाडी, दत्तनगर, भुरेखानगर, खाटीकपुरा, गवळीपुरा आदी भागात तीन-चार दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले. परंतु पुढे सात-आठ महिने बाकी आहे. कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी संपले तर शहरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच पर्यायी उपाययोजना शोधाव्या लागणार आहे. शहरासोबतच ग्रामीणमधील जवळपास ५९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही गावातील नळ योजना तलाव विहिरीतील पाण्याची पातळी घटल्याने प्रभावित झाला आहे. हँडपंप बंद पडले आहे. सध्या हिवाळ्यात ही स्थिती असून उन्हाळ्याचे चार महिने कसे होईल याची चिंता सर्वांना लागली आहे.
पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न
यावर्षी दारव्हा तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्या गावात पाणी समस्या उद्भवू शकते याची माहिती घेण्यात आली आहे. त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करून कामे केले जातील. यावर्षी भीषण स्थिती असली तरी पाणीटंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे पंचायत समिती सभापती उषाताई प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले.

पेकर्डा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पूर्ण भार अरुणावती व कुपटी योजनेवर आहे. अरुणावती योजनेची अडचण नाही. परंतु कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी बंद झाल्यास समस्या उद्भवू नये याकरिता कुपटी योजनेजवळ बोअर मारण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळेल व कोणतीही अडचण जाणार नाही.
- आरिफ काजी,
सभापती, पाणीपुरवठा नगरपरिषद.

Web Title: Water shortage in Darwha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.