पुसद तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:22 AM2017-12-01T01:22:02+5:302017-12-01T01:22:06+5:30

यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसाने पुसद शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. शहरात आठवड्यातून तीन दिवसच नळ येत असून नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना बसत आहे.

Water shortage on Pusad taluka | पुसद तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

पुसद तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

Next
ठळक मुद्देमाळपठारात परिस्थिती गंभीर : शहरात नियोजनाअभावी नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसाने पुसद शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. शहरात आठवड्यातून तीन दिवसच नळ येत असून नगरपरिषदेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना बसत आहे. तर पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध माळपठारात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योग्य नियोजन करण्यात आले नाही तर तालुक्यात पाणीटंचाईचा स्फोट होऊ शकतो.
पुसद तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत मात्र आतापासूनच तळाला गेले आहे. पुसद शहराला पूस धरणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात जेमतेम १५ ते २० टक्के पाणी आहे. त्यामुळे पुसदकरांना आतापासूनच आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा केला जातो. तोही अनेक भागात पुरेसा नसतो. गत १५ दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातील नागरिकांनी पाण्यासाठी रस्ता रोको करुन आपला रोष व्यक्त केला होता. इटावा वार्डातही तीच परिस्थिती आहे. दरवर्षी या भागातील नागरिक पाण्यासाठी आंदोलन करतात. शहरातील पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली असून त्यामुळे योग्य दाबाने पाणी पोहोचत नाही. पूस नदीच्या जवळील एका वॉलमधून अहोरात्र पाण्याची गळती सुरू असते. शिवाजी चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली होती. आठ दिवस दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. त्या ठिकाणी खड्डा पडल्याने नागरिकांनाही त्रास झाला. नगरपरिषद पाण्याबाबत गांभीर्याने घेताना दिसत नाही. शहरासाठी पाण्याच्या तीन टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी धरणापासून टाकीपर्यंत पाणी आणण्याचे प्रयत्न अपुरे ठरले आहे. आतापासून पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर एप्रिल-मे महिन्यात शहरात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील अवस्था याही पेक्षा बिकट आहे. नदी-नाले कोरडे असून हातपंप आणि विहिरींची पातळी तळाला गेली आहे. त्यामुळे गाव, वाडी आणि तांड्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. माळपठार तर पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. चाळीसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी काही गावांना मिळते आणि काही गावांना मिळतच नाही.
माळपठारातील आमटी, कुंभारी, म्हैसमाळ, मारवाडी, हनवतखेडा, पिंपळगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक आतापासून विकतचे पाणी घेत आहेत. टँकरद्वारे पाणी आणून त्याची साठवणूक करावी लागते. श्रीमंत मंडळी पाणी विकत घेतात. परंतु गोरगरिबांना पायपीट करून पाणी आणण्याशिवाय पर्याय नसतो. पंचायत समितीचा कृती आराखडा मंजूर असला तरी अद्यापपर्यंत त्याच्या उपाययोजना सुरु झाल्या नाही. प्रशासकीय मान्यतेतच हा आराखडा रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
खरुस बु. येथे कृत्रिम पाणीटंचाई
उमरखेड : ग्रामपंचायतीने वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील खरुस बु. येथील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे येथील मागासवर्गीय वस्तीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत पाच महिन्यांपासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन खरुस बु. येथील पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी माजी उपसरपंच विजय कांबळे यांनी एका निवेदनातून केली आहे. मागासवर्गीय वसाहतीमध्ये दोन हातपंपाद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. मजुरांची वस्ती असलेल्या या भागातील नागरिकांची पाण्यासाठी परवड होत आहे.

Web Title: Water shortage on Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.