पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे
By admin | Published: March 23, 2017 12:26 AM2017-03-23T00:26:23+5:302017-03-23T00:26:23+5:30
पैनगंगा नदीकाठावरील सर्व गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. नदीपात्रात त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी
नागरिक धडकले तहसीलवर : नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई
उमरखेड : पैनगंगा नदीकाठावरील सर्व गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. नदीपात्रात त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी बुधवारी या गावांमधील नागरिक तहसील कार्यालयावर धडकले.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेच्या नदीपात्रात पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नदीपात्रात पुरेसे पाणी सोडण्यात यावे ही नागरिकांची मागणी आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले. पैनगंगा नदीत इसापूर धरणातून पाणी सोडले आहे. परंतु ते पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे ब्राह्मणगाव, बिटरगाव, सावळेश्वर, बोरी, चातारी, मानकेश्वर, सिंदगी, दिघी, पळसपूर, जेलारी, कवठा आदींसह अनेक गावात पाणी पोहोचलेच नाही. दहा दलघमी पाणी सध्या चालू आहे. ते पाणी पैनगंगा नदीपात्रातून शेवटपर्यंत जात नाही. त्यामुळे पाणी अधिक प्रमाणात सोडण्याची गरज आहे. दहा दलघमी पाणी अतिरिक्त सोडण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरवर्षी विदर्भ-मराठवाड्यातील पैनगंगा नदीकाठावरील असंख्य गावांमध्ये उन्हाळ््याच्या दिवसांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. यावर्षी पावसाळ््यात चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेताला तर सोडाच पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होताना दिसत नाही. जनावरे कशी जगवावी हाही प्रश्न नागरिकांच्यासमोर आहे. इसापूर धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी अत्यल्प आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही त्याचा कोणताही लाभ न झाल्याने अखेरीस शेतकऱ्यांनी उमरखेड तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार भगवान कांबळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी अॅड़ शिवाजीराव वानखेडे, धनंजय माने, वामन वानखेडे, रणजीत वानखेडे, सुदर्शन रावते, अनसाजी पतंगे, दादाराव वानखेडे, संदीप देवसरकर, पांडुरंग माने, शेख रहीम, परमेश्वर माने, गणपत रावते, बापूराव वानखेडे, सुनील वानखेडे, संतोष माने आदींसह विदर्भ-मराठवाड्यातील अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)