अधरपूस, ईसापूर, पूस धरणात पाणीसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:43+5:302021-07-23T04:25:43+5:30
ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : मागील दोन वर्षांचे पर्जन्यमान परिस्थिती पाहता यंदा पावसाने दमदार वाटचाल केली. केवळ ५२ दिवसात तालुक्यात ...
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : मागील दोन वर्षांचे पर्जन्यमान परिस्थिती पाहता यंदा पावसाने दमदार वाटचाल केली. केवळ ५२ दिवसात तालुक्यात तब्बल ३५७ मिलीमीटर पाऊस कोसळला. पीक परिस्थिती चांगली असून मजुरांच्या हातांना काम मिळाल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरात आनंदाचे वातावरण आहे.
तालुक्यातील वेणी अधरपूस धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. पुसद व उमरखेड तालुक्यातील पूस धरण आणि ईसापूर धरणातील पाणीसाठा निम्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे यंदा या तीनही तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. येत्या रब्बी हंगामासाठी ते लाभदायक ठरणार आहे. मागील वर्षीच्या पावसापेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पर्जन्यमान स्थितीवरून ही बाब दिसून येते.
यंदा मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लवकरच सुरुवात केली. यावर्षी लागवड, पेरण्यासुद्धा लवकर आटोपल्या. मधला पावसाचा खंड शेतकऱ्यांना धडकी भरवणारा ठरला. मात्र, अगदी वेळेवर पावसाने परत चांगली सुरुवात केली. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाशी दोन हात करीत बळीराजा मोठ्या हिमतीने शेती कसत आहे. मेहनती व कष्टाळू शेतकरी, शेतमजुरांना कोरोनाचा कमी प्रमाणात धोका जाणवला. त्यांची आरोग्य प्रतिकारशक्ती कमालीची दिसून आली.
बॉक्स
एकाच दिवशी ६० मि.मी. पाऊस
मागील ५० दिवसांत बुधवार, २१ जुलै रोजी सर्वाधिक ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप तालुक्यात कुठेही शेती नुकसान झाल्याची महसूल दप्तरी नोंद नाही. दरम्यान, पूस धरण भरण्याच्या स्थितीत असून वेणी अधरपूसचे गेट खुले करण्याची गुरुवारी रात्री उशिरा तयारी करण्याची तयारी सुरू आहे. वेणी अधरपूस ६० टक्के भरले आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबिलवादे यांनी केले आहे.
220721\img-20210722-wa0037.jpg
वेणी अधरपुस धरण