जिल्ह्यातील ३९ गावांना टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:21 PM2018-04-13T23:21:41+5:302018-04-13T23:21:41+5:30
अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
यवतमाळ : अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाणी झाले. त्यामुळे हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली होती. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. १४ कोटी रुपयांचा कृती आराखडाही तयार केला. मात्र गावागावातील पाणीटंचाईने आता उग्ररुप धारण केले आहे. जिल्ह्यातील ३९ गावात कोणतेच जलस्रोत नसल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सद्यस्थितीत सुरू आहे. तालुक्यातील खरडगाव झोंबाडी, सातेफळ, अजंती, घुई, चिकणी डोमगा या गावात दररोज टँकर पोहोचत आहे. आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, चिमटा, खडका, पाळोदी, बाभूळगाव तालुक्यातील सारफळी, फत्तेपूर, दारव्हा तालुक्यातील तोरनाळा, तेलगव्हाण, करजगाव, कोहळा, कळंब तालुक्यातील गणेशवाडी, पांढरकवडा तालुक्यातील सुकळी पोड, उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव, वणीच्या पेटूर, नायगाव, सावंगी, यवतमाळातील पांढरी, धानोरा, इथोरी, जांबुळणी, लोहारा, पुसद तालुक्यातील बाळेवाडी, मुंगसाजीनगर, पन्हाळा, म्हैसमाळ, मारवाडी, महागावातील टेंभुरधरा, फुलसावंगी आणि घाटंजी तालुक्यातील ताडसावळी, पारवा, टिपेश्वर पुनर्वसन, चांदापूर, पंगडी या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मारेगाव आणि दिग्रस या दोन तालुक्यात अद्यापपर्यंत टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील १८६ गावातील १८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल दारव्हा तालुक्यात ३२, आर्णी आणि यवतमाळ तालुक्यात २२ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
प्रकल्पांमध्ये केवळ १८.७१ टक्के पाणी
यवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम आणि ९१ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये २०२.७८ दलघमी म्हणजे केवळ १८.७१ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पांमध्ये अपुरा जलसाठा असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४, अरुणावती प्रकल्पात ८.८२, बेंबळा प्रकल्पात १४.४८ टक्के जलसाठा आहे. तर अडाण प्रकल्पात १७.३२, नवरगाव २४.५२, गोखी ८.५५, वाघाडी १०.५५, सायखेडा ५०.४४, अधरपूस ३२.७७, बोरगाव ८.१७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांची संकल्पीत पाणी साठा क्षमता १०८३.७७ दलघमी असून या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या २०२.७८ दलघमी पाणीसाठा आहे.