दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:06 PM2018-08-18T22:06:55+5:302018-08-18T22:07:48+5:30

शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Water supply in the Darwha | दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

Next
ठळक मुद्देलेंडी नाल्यामुळे धोका वाढला : वाहतुकीचा खोळंबा, नित्याचाच प्रकार

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लेंडी नाल्याला पूर आला, की जागोजागी पाणी तुंबते. तुंबलेले पाणी आजूबाजूच्या नगरांतील घरे, दुकानांमध्ये शिरते. रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जुने व नवीन शहराच्या मध्यभागातून हा लेंडी नाला वाहतो. रेल्वे स्टेशन परिसर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, गोळीबार चौक, वर्षा टॉकीज परिसर, असा प्रवास करीत या नाल्याचे पाणी शहराबाहेर जाते. नाला कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढतात. त्यामुळे दरवर्षी नगरपरिषदेला मान्सूनपूर्वी हा नाला जेसीबी मशीनद्वारे स्वच्छ करावा लागतो. तरीसुद्धा पूर्णपणे नाला स्वच्छ होत नाही.
काही भागात मशीनच्या कामामुळे दिवसेंदिवस नाल्याचा आकार मोठा होत आहे. नाल्यात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे कचरा अटकून जागोजागी पाणी थोपून राहते. तेच पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरते. थोडासा पाऊस पडला, तरी नाल्याला पूर येतो. १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर कॉलनी, बस स्थानक परिसर, गोळीबार चौक, आर्णी रोड आदी परिसरांमध्ये शिरून अनेक घरे व दुकानांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना फटका बसला.
बस स्थानकातील प्रवाशांचे हाल झाले. यवतमाळ, कारंजा, आर्णी राज्य मार्गाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. शहरवासीयांना वेठीस धरणारा ही समस्या कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
नाल्याचे बांधकाम आवश्यक
लेंडी नाल्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून पाणी येते. हे पाणी नाल्यात शिरू न देता तेथे एखादा बंधारा बांधणे आवश्यक आहे. शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे व मध्ये असलेल्या दोन पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे. यामुळे पावसाळ्यात होणारा नाल्याचा उपद्रव कायमचा बंद होऊ शकतो. तसेच इतरवेळी साचून राहणाऱ्या पाण्यामुळे होणारी घाण नष्ट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. नगरपरिषदेने याकरिता पुढाकार घेऊन नाल्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Water supply in the Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.