चापडोहचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:58 AM2018-05-03T00:58:01+5:302018-05-03T00:58:01+5:30

चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे.

Water supply to Junkyard | चापडोहचा पाणीपुरवठा ठप्प

चापडोहचा पाणीपुरवठा ठप्प

Next
ठळक मुद्देअर्ध्या शहराची भिस्त टँकरवर : गोखीचे पाणी ७० हजार लोकसंख्येला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे. परिणामी अर्ध्याअधिक यवतमाळ शहराची भिस्त आता केवळ टँकरच्या पाण्यावरच आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यात आहे.
यवतमाळ शहराला चापडोह आणि निळाणा धरणाच्या मृत साठ्यातून पाणी पुरवठा केला जातो. तीन आठवड्यातून एकदा नाळाद्वारे पाणी पुरवठा तोही अनियमित होत आहे. शहरात चापडोह आणि निळोणा असे झोन तयार करून पाणी पुरवठा केला जात होता. चापडोह प्रकल्पातून वाघापूर, पिंपळगाव, लोहारा, वैभवनगर, सुयोगनगर, दर्डानगर टाकी या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. दरम्यान गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळात आणण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकल्पाचे पाणी सुयोगनगर, दर्डानगर आणि लोहारा या तीन टाक्यांमध्ये सोडले जाणार आहे. आता चापडोहचे पाणी संपल्याने वाघापूर, पिंपळगाव, वैभवनगर टाकीतून होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद झाला आहे.
वाघापूरच्या टाकीवरून बांगरनगर, अग्रवाल ले-आऊट, लोखंडे प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अभिनव कॉलनी, सेमीनरी कंपाऊंड, राजेंद्रनगर, वंजारी फैल, तलावफैल, कॉटन मार्केट, गांधीनगर, गोदाम फैल, मधुबन सोसायटी, केशव पार्क, कमलापार्क ते चांदोरेनगर, मोहा गावठानापर्यंत पाणीपुरवठा होत होता. पिंपळगाव टाकीतून शिवगड मंदिर, विसावा कॉलनी, पोलीस मित्र सोसायटी, आकृती पार्कसह गजानन नगरी, रजनी पार्क, बालाजीनगर, शंकरनगर या भागात पुरवठा केला जात होता. वैभवनगर टाकीवरून वैभवनगर, महात्मा फुले सोसायटी, राऊतनगर, चिंतामणीनगर, चाणाक्यनगर, सिद्धेश्वरनगर, वाघापूर टेकडी, राधाकृष्णनगरी, मैथिलीनगर, शिवाजीनगर, सानेगुरुजीनगर, गायत्रीनगर, आठवले ले-आऊट, वाघाई नगरी, विलासनगर या परिसरात पाणीपुरवठा केला जात होता. यवतमाळ शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन हे ४० टक्के चापडोह आणि ६० टक्के निळोणा असे करण्यात आले होते. बुधवारी विठ्ठलवाडी व बांगरनगर परिसरात नळ सोडण्यात आले. मात्र तासाभरातच हा पुरवठा ठप्प झाला. अचानक नळ बंद झाल्याने या भागात नागरिकांनी रोष व्यक्त केला. थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठून त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निळोणा प्रकल्पाचाही पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी ठप्प होऊ शकतो. अशा स्थितीत केवळ गोखी प्रकल्पावरच भिस्त आहे. त्या प्रकल्पाच्या मर्यादा लक्षात घेता तीन टाक्यांवर पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शहरात गोखीचेच पाणी टँकरच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे. या प्रकल्पाच्या प्लॉन्टवर तान वाढल्याने तेथील मर्यादाही उघड होत आहे.

श्रेयासाठी लोकार्पणाची घाई
संपूर्ण शहर पाणीटंचाईने होरपळत असताना राजकीय मंडळी मात्र श्रेय घेण्यात धन्यता मानत आहे. खासदारांनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसातच पालकमंत्री पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला म्हणून गोखीच्या पाण्याचे मंगळवारी लोकार्पण केले. तसे फलकही लोहारा परिसरात लावण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कामाची बुधवारी ट्रायल घेत असतानाच दोन वेळा पाईप उखडले गेले. त्यामुळे १ मेपर्यंत पाणी मिळणार असा शब्द देणाऱ्या नेते मंडळीला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. गोखीचे पाणी शहरात येत असले तरी केवळ एका भागातील ७० हजार नागरिकांचीच तहान भागविणार आहे. उर्वरित एक लाख ८० हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी कायम आहे. बेंबळाच्या पाण्याबाबत अधिकृतपणे यंत्रणेतून कुणीच बोलायला तयार नाही. राजकीय मंडळी मात्र ठासून आश्वासने देत आहे.

चापडोहचा पुरवठा बुधवारी बंद पडला. निळोण्याबाबतही आशादायक चित्र नाही. गोखी प्रकल्पातून मर्यादित स्वरूपात व्यवस्था केली जात आहे. बेंबळाचे पाणी मे अखेर येण्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
- स्वप्नील तांगडे
उपविभागीय अधिकारी, यवतमाळ.

Web Title: Water supply to Junkyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.