गॅसपंपच्या खोदकामाने पाणीपुरवठा पडला ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:08 PM2019-07-04T21:08:29+5:302019-07-04T21:09:29+5:30
नगरपरिषद हद्दीत कुठल्याही बांधकाम त्यात गॅसपंप टाकायचा असेल तर अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. येथील दारव्हा मार्गावर प्रभाग २६ मध्ये गॅसपंपाच्या खोदकामात पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. तर मागील १५ दिवसांपासून या भागाचा पाणीपुरवठा ठप्प आहे. भरपावसात पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषद हद्दीत कुठल्याही बांधकाम त्यात गॅसपंप टाकायचा असेल तर अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. येथील दारव्हा मार्गावर प्रभाग २६ मध्ये गॅसपंपाच्या खोदकामात पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. तर मागील १५ दिवसांपासून या भागाचा पाणीपुरवठा ठप्प आहे. भरपावसात पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे.
नगरपरिषदेचे कुणावरच नियंत्रण राहिले नाही. इमाने इतबारे परवानगी काढून बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या लुबाडल्या जाते. दुसरीकडे व्यावसायिक व अत्यंत ज्वलनशील समजल्या जाणाºया गॅसपंपचे काम सुरू केले. दारव्हा मार्गावर एकवीरा पॉर्इंटच्या समोर खासगी गॅसपंपाचे काम सुरू आहे. यातून वाहनांमध्ये गॅस रिफिल केला जाणार आहे. या गॅसपंपाच्या खोदकामात जेसीबीने प्रभाग २६ मधील पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फोडली. यामध्ये हजारो लिटर पाणी वाहून गेले. शहरात आठ दिवसाआड पाण्याचे नियोजन सुरू आहे. अशातच पाईपलाईन फुटल्याने लोहारा भागातील नागरिकांसमोर पाणीटंचाईची समस्या उभी ठाकली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने गॅसपंपासाठी खोदकाम करताना मुख्य पाईप फोडला. याची माहिती जीवन प्राधिकरण अथवा पालिकेच्या विभागीय कार्यालयात दिली नाही. त्यामुळे नळ सोडण्यात आले मात्र पुरवठा झालाच नाही. फुटलेल्या पाईपातून पाणी वाहून गेले. या गंभीर प्रकरणात पालिका प्रशासनाने व जीवन प्राधिकरणकडून फौजदारी कारवाई होणे अपेक्षित आहे. ऐन पावसाळ्यात प्रभाग २६ व लोहारा भागातील नागरिकांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागले.
नगरपरिषदेच्या लोहारा विभागीय कार्यालयात गॅसपंपच्या बांधकामाबाबत परवानगी झाली काय, याची चौकशी केली असता यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रभाग २६ च्या क्षेत्रीय अभियत्यांनी गॅसपंपच्या परवानगीबाबतचा प्रस्ताव आला असून त्याचे अभिन्यास शुल्क काढून दिल्याचे सांगितले.या गॅसपंपाला अनधिकृत परवानगी देण्यात आल्याची शंका परिसरातील नागरिक व्यक्त करत आहे. अगदी घराला लागूनच गॅसपंप होत असल्याने काही नागरिकांचा यावर आक्षेप आहे.