ब्लिचिंग न टाकताच पाणीपुरवठा
By admin | Published: July 3, 2015 12:17 AM2015-07-03T00:17:59+5:302015-07-03T00:17:59+5:30
तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहे. मात्र काही सरपंच व ग्रामसचिव उदासीन आहेत.
वणी : तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहे. मात्र काही सरपंच व ग्रामसचिव उदासीन आहेत. त्यामुळे गावातील पाण्यात ब्लिचिंग पावडर न टाकताच पाणी पुरवठा सुरू आहे. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या महिन्यात ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहे.
आता पावसाळा सुरू झाला. पावसाळ्यात पाणी दूषित होऊन विविध साथरोग पसरतात. त्यामुळे शासनातर्फे पाणी शुद्धिकरणसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यात पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचींग पावडर टाकण्याचीही योजना आहे. येथील पंचायत समितीमार्फत तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींना हे ब्लिचिंग पावडर पुरविले जाते. मात्र पावसाळ्याला सुरुवात होऊनही अनेक ग्रामपंचायतींनी अद्यापही पंचायत समितीतून ब्लिचिंग पावडर न नेल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात अनेक गावांतील पाणी पिण्यायोग्य नसते. ते पाणी निर्जंतुकीकरण करून व ब्लिचिंग पावडर टाकूनच शुद्ध केले जाते. नंतर तेच पाणी गावात नळाद्वारे सोडणे गरजेचे आहे. गावातील विहिरींमध्येही ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. मात्र अनेक सरपंच व ग्रामसचिव या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर अशुद्ध पाणी प्राशन करण्याची वेळ आली आहे.
उन्हाळा व पावसाळ्याच्या तोंडवर विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. यामुळे विविध आजार डोके वर काढण्याची शक्यता बळावली आहे. विहिरीत व पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याशिवाय पर्यायच नाही. परिणामी अनेक आजारांचे मूळ असेलेले दूषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे.
तालुक्यातील काही गावांमध्ये क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण जादा आहे. काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. क्षारयुक्त आणि फ्लोराईडयुक्त पाणी पिणे आरोग्यास धोकादायक मानले जाते. त्यामुळे त्याचे निर्जंतुकीकरण गरजेचे असते. मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांकडून मालमत्ता व पाणी कर वसूल करणारे ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या जीवावरच उठल्याचे दिसत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनातर्फे मात्र गावकऱ्यांना पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात पाणी प्राशन केल्यानंतर त्यात ब्लिचिंग पावडर टाकले की नाही, याचा अनुभव येतो. गेल्या सप्ताहात तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला. सर्व नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदीतील पाणीही आता पिण्यायोग्य नाही. नदी, नाल्यात काडी, कचरा, मोठे वृक्ष वाढल्याने नदीतील पाणी गढूळ झाले आहे. ते पाणी नळाद्वारे सोडताना निर्जंतुकीकरण व ब्लिचिंग पावडर न टाकताच सोडले जात आहे. परिणामी काही गावांमध्ये साथ रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात येत्या २५ जुलैला ४२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासोभतच काही गावांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे अशा गावांना केवळ निवडणुकीचे वेध लागले आहे. तेथील विद्यमान पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेचे काहीही देणे-घेणे नाही.
अनेक गावांतील गावपुढारी गावात केवळ निवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध घेण्यातच मग्न आहे. काही इच्छुक उमेदवार दररोज तहसीलमध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी चकरा मारत आहे. या सर्व बाबींमुळे गावात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचे कुणालाही सोयरसूतक नाही. केवळ येत्या निवडणुकीत सत्ता यावी म्हणून गावपुढारी आपापल्या पद्धतीने ‘फिल्डींग’ लावताना दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)