जलयुक्तने मिळाले सोयाबीनला जीवदान
By Admin | Published: August 27, 2016 12:44 AM2016-08-27T00:44:35+5:302016-08-27T00:44:35+5:30
सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे.
कृषी विभाग : दारव्हा तालुक्यात ३६ गावांत ९० सिमेंट नाला बांध
दारव्हा : सोयाबीनचे पीक शेंगा धरायला लागले अन् पावसाने दडी मारली. शेंगा परिपक्व होण्यासाठी किमान एका पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. मात्र जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावात हे अभियान या पिकासाठी संजीवनी ठरले आहे.
दारव्हा तालुक्यात कृषी विभागाने एकूण ३६ गावांत सिमेंट नालाबांध खोलीकरणाची ९० कामे केली. त्यात धामणगाव (देव) येथे झालेल्या कामांचा चांगला फायदा या गावातील शेतकऱ्यांना झाल्याचे सांगितले जात आहे.
यावर्षी पावसाळा जोरदार राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडा उशीर का होईना वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. मध्यंतरीही चांगला पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात पिकांना चांगला फायदा झाला. परंतु सध्या पावसाने दडी मारली आहे. गेली दोन आठवड्यापासून पाऊस नाही.
कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात आली त्याठिकाणी चांगला फायदा सोयाबीनला झाला आहे. धामणगाव (देव) येथे शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला होता. या गावात नाला खोलीकरणाच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाव्दारे सोयाबीनचे पीक वाचविण्यात शेतकरी बांधव यशस्वी झाले आहे. त्यामुळे धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियान सोयाबीनसाठी संजीवनी ठरल्याचे बोलले जात आहे. पाऊस नसल्याचा परिणाम सोयाबीनच्या अॅव्हरेजवर झाला आहे. मात्र धामणगावसारख्या काही गावात पाणी उपलब्ध झाल्याने त्याचा काही शेतकऱ्यांना फायदा निश्चित झाला. ज्या गावात पाणी नाही आणि विजेचे भारनियमन वा अन्य कारणामुळे जे शेतकरी पिकाला पाणी देऊ शकले नाही, त्यांचे सोयाबीन हातचे गेले, असे शेतकरी सांगतात. (तालुका प्रतिनिधी)