यवतमाळात पाण्याचा व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:24 PM2018-03-30T23:24:19+5:302018-03-30T23:24:19+5:30

शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे.

Water trade in Yavatmal | यवतमाळात पाण्याचा व्यापार

यवतमाळात पाण्याचा व्यापार

Next
ठळक मुद्देनगरपरिषदेच्या पाणवठ्यावर झुंबड : खासगी टँकरने विहिरी कोरड्या

सुरेंद्र राऊत।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरातील पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेच्या पाणवठ्यावर खासगी टँकरचा धुमाकूळ सुरू असून फुकटात मिळालेले पाणी बेभाव विकण्याचा सपाटा बहुतांश खासगी टँकर चालकांनी सुरू केला आहे. शहरातील विविध भागातील विहिरी अतिरिक्त उपस्यामुळे तळाला जात आहे. या टँकरचालकांवर निर्बंध आणले नाही तर यवतमाळकरांसाठी असलेला एकमेव पर्याय भूगर्भातील जल साठाही संपण्याची भीती आहे.
नगरपरिषदेने टंचाई निवारणासाठी ५६ टँकर सुरू केले आहे. एका प्रभागात दोन टँकर याप्रमाणे नियोजन आहे. एका विहिरीवरून दोन टँकर ३६ हजार लिटर पाण्याचा उपसा करते. तुडूंब भरलेल्या विहिरी टँकर लागताच अवघ्या काही तासात तळ गाठत आहे. यात खासगी टँकर माफियांनी स्वत:चे उखळ पांढरे करणे सुरू आहे. पूर्वी ४०० रुपयात मिळणाऱ्या टँकरला आता एक हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे. नळ नियमित असल्याने भूजलावर इतका ताण नव्हता. आता घरगुती विहिरी, बोअरवेल आणि सार्वजनिक विहिरीतून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. बांधकामांसाठी टँकरने पाणी पुरविले जाते.
नगरपरिषदेने २० विहिरींवर सबमर्शिबल पंप बसविले असून त्या प्रभागातील शिपायाच्या नियंत्रणात टँकर भरून दिले जाते. येथे खासगी टँकर माफिया शिपायाला चिरीमिरी देवून टँकर भरून घेतात. इतकेच नव्हेतर काही नगरसेवकांच्या शिफारपत्रावर एमआयडीसीतूनही खासगी टँकर पाणी भरत आहे. काही नगरसेवकांनी शिफारसपत्राचाही गोरखधंदा सुरू केला आहे.
पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळत असताना संधीसाधू खासगी टँकरवाले, काही नगरसेवक, पालिकेतील यंत्रणा आपले हात धुवून घेत आहे. वारेमाप उपस्यामुळे सहकारनगर, बोदड, श्रीरामनगर, नेहरू उद्यान येथील भरमसाठ पाण्याच्या विहिरी उपस्यामुळे तळाला गेल्या आहे.
शहरात आढळल्या भरमसाठ पाण्याच्या विहिरी
लोहारा येथील राधाकृष्णनगरच्या विहिरीतील गाळ काढल्यानंतर भरमसाठ पाणी लागले. कॉटन मार्केट मागील विहीर, व्यंकटेशनगरातील खचलेली विहिरीतही पाणी आहे. भोसा येथील आंब्याची विहीर, मोहा येथील विहिरीत पाणीसाठा आढळून आला. याशिवाय दत्त चौकातील हौदातही भरपूर पाणी असून आता तेथे गाळ काढणेही शक्य होत नाही. या हौदावरही टँकर लावण्याचे नियोजन पालिका करीत आहे. शहरातील अशा विहिरींचे कायमस्वरूपी जतन करण्याची गरज आहे.
अशी होते पाण्याची चोरी
नगरपरिषदेने एका प्रभागात दोन टँकर दिले आहे. प्रभागाची लोकसंख्या सरासरी दहा हजार इतकी आहे. प्रत्येकी तीन हजार लिटरचे दोन टँकरला दिवसभºयात सहा ट्रिपा म्हणजे ३६ हजार लिटर पाणी एका प्रभागात वितरित करीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. असे नियोजन असतानाही प्रभागातील पाण्याची वानवा कायम आहे. यावरूनच पाणी चोरी होत असल्याचे उघडपणे दिसून येते. प्रभागात किमान ४० टक्के नागरिकांकडे स्वत:चे जलस्त्रोत आहे. त्यांना टँकरचे पाणी लागत नाही. त्यानंतरही दिवसाकाठी ३६ हजार लिटर पाणी वितरण करूनही टंचाई कायम असल्याचे वास्तव आहे. पालिकेच्या टँकरकडून प्रत्यक्षात किती ट्रीपा होतात, नेमके हे पाणी कुठे मुरते हे कोड कायम आहे.
गाळ काढण्याचे सोपस्कार
नगरपरिषदेने ७९ विहिरींच्या सफाईचे नियोजन केले असून ६०० रुपये घनमीटर दराने गाळ काढला जात आहे. यात पाणी उपसणे, क्रेन मशीन व बाहेर टाकलेला गाळ उचलणे याचे वेगळे दर आकारले जात आहे. खोदकाम नसल्याने अनेक विहिरींना तात्पुरते पाणी दिसत आहे. लगतच्या काळात या विहिरी खोदल्याशिवाय पाणी पुरणे शक्य नाही. अशाही स्थितीत पालिकेने साफ केलेल्या २० विहिरींपैकी केवळ तेलंगेनगर येथील एक विहीर कोरडी निघाली.

Web Title: Water trade in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी