जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय
By admin | Published: May 1, 2017 12:20 AM2017-05-01T00:20:31+5:302017-05-01T00:20:31+5:30
जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.
हजारो लिटर पाणी रस्त्यावर : दिग्रस शहरात पाणीटंचाईचे उग्ररूप
दिग्रस : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प दिग्रस शहरानजीक असताना नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात एक दिवसाआड तेही अल्प पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे, तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पातून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या दिग्रसकरांना वाहून जाणारे पाणी पाहून संताप येत आहे.
दिग्रस शहरानजीक जिल्ह्यातील सर्वात मोठा अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाहून मानोरा, वाशिम, दारव्हा आणि दिग्रस शहराला पाणीपुरवठा केला जातो. गत काही दिवसांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेकांच्या नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. दिग्रस शहरात होणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशी नागरिकांची मागणी असते. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. तर दुसरीकडे अरुणावती प्रकल्पावरून वाशिमकडे जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे.
दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर वॉलमधून पाण्याचे कारंजे उडत आहे. या वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाहून जाते. शहरातील अनेकजण या वॉलमधून पाणी भरताना दिसतात. परंतु रस्त्याच्या बाजूला पाण्याचे लोट वाहताना दिसत आहे. एकीकडे दिग्रस शहरात पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय पाहण्याची वेळ दिग्रसकरांवर आली आहे. याबाबत वरिष्ठांना सूचनाही देण्यात आली आहे. परंतु गत काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. हजारो लिटर पाणी वाहून जाताना पाहून दिग्रसकरांचा संताप अनावर होत आहे. या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी आणि दिग्रसला मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण भाग होरपळतोय
दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही बंद पडले आहे. नळयोजना भारनियमनामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अरुणावती प्रकल्पात प्रचंड जलसाठा डोळ्याने पाहताना या नागरिकांना पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे.