पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:37 PM2018-04-17T23:37:18+5:302018-04-17T23:37:18+5:30
विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहे. पाण्यासाठी नागरिकांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. पाण्यासाठी मजुरी पाडावी लागत आहे. रानोरान भटकूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तळपत्या उन्हात डोक्यावर गुंड घेऊन पाण्यासाठी दूरवर भटकणाऱ्या महिलांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.
आजंती(खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांच्या योजना या गावासाठी आल्या. पाण्याची टाकी उभी झाली. मात्र मागील दोन वर्षांपासून नळ सुरू झाले नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासन याविषयी गंभीर नाही. मोझर गावातील विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्या आहे. नागरिक दिवसरात्र पाण्यासाठी भटकत आहे. घुई या गावाला ‘आमचे गाव, आमचा विकास’ अंतर्गत दहा लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्याची शोभा वाढवित आहे.
मांगलादेवी, वटफळी, परजना, उमरठा आदी गावे पाणीटंचाईने होरपळून निघाली आहे. पंचायत समितीकडून कृती आराखडा तयार केला जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती यापुढे कृती आराखडा सरकत नाही. दरवर्षीचाच कित्ता याहीवेळी गिरविला गेला. तालुक्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासन हातावर हात ठेऊन बसले आहे, तर लोकप्रतिनिधींना समस्याग्रस्त भागात फिरण्यासही सवड नाही. नागरिकांमध्ये मात्र कमालीचा रोष आहे.
सिंदखेड येथे वसुलीचा तगादा
पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना सिंदखेड ग्रामपंचायतीने थकीत बिलासाठी नळ जोडण्या कापण्याचा ठराव घेतला. त्याच कारणावरून हाणामारीचे प्रकारही घडत आहे. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या गावात आठ दिवसातून एकदा नळाला पाणी सोडले जात आहे. तरीही पाणीकराच्या वसुलीसाठी लोकांना त्रस्त करून सोडले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांच्या रोषाचे बळी ठरत आहे. श्यामराव राठोड यांना मारहाणीचा प्रकारही या गावात घडला. पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता वसुलीची कारवाई थांबविली जावी, अशी मागणी मिलन राठोड यांनी केली आहे.