टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठे दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:56 PM2018-02-20T23:56:13+5:302018-02-20T23:56:57+5:30
ऑनलाईन लोकमत
वणी : दोन तालुक्यात विखुरलेल्या व पर्यटकांना कायम खुणावणाºया टिपेश्वर अभयारण्यातील पाणवठ्याच्या देखभालीकडे अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे. आठवड्यातून एकदा तरी या पाणवठ्याची स्वच्छता व्हावी, असे अपेक्षित असताना तसे घडताना दिसत नाही. परिणामी हे पाणवठे कचऱ्याने तुंबून असल्याचे निदर्शनास येते.
टिपेश्वर अभयारण्यात १३ पेक्षा अधिक वाघांचा वावर असल्याने या अभयारण्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र वन्यजीवांच्या सोईसुविधांकडे प्रशासनाचे लक्षच नसल्याचे दिसून येते. वन्यजीवांची तहान भागावी यासाठी या अभयारण्यात ६५ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. त्यातील २२ ते २५ पाणवठे हे सौरऊर्जेवर चालतात. मात्र हे सर्वच पाणवठ्यांमध्ये कचरा साचलेला असतो. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी दूषित होत चालले आहे. दर सोमवारी हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येते. निदान या दिवशी तरी पाणवठ्यांची देखभाल होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पानगळती होते. झाडांचा पालापाचोळा या पाणवठ्यात पडतो. त्यामुळे पाणी दूषित होते. पाणवठ्याच्या अवतीभोवती सदाहरित झाडांची लागवड करणेही आवश्यक असते. मात्र अनेक पाणवठ्याच्या अवतीभोवती सागवानी झाडे आहेत. उन्हाळ्यात ही झाडे निष्पर्ण असतात. त्यामुळे पाणवठ्यातील पाणी उन्हामुळे तापते. त्याच गरम पाण्यावर वन्यजीवांना आपली तहान भागवावी लागते. यासंदर्भात टिपेश्वर अभयारण्याचे आरएफओ अमर सिडाम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
१४८ चौैरस स्केअर किलोमिटरवर पांढरकवडा व घाटंजी अशा दोन तालुक्यात विस्तारलेल्या या अभयारण्यात वाघांसह सर्वच वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे दर दिवशी या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी असते. राष्ट्रीय महामार्गापासून केवळ दिड किलोमिटर अंतरावर असलेला हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे, हे विशेष.
पाणवठे असुरक्षित
टिपेश्वर अभयारण्यातील अनेक पाणवठे पर्यटकांच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. के.सी.अर्थात कुडचीकुडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॉइंटवरील पाणवठ्याला कोणत्याही प्रकारचा दगडाचा बांध अथवा लाकडाचे कंपाऊंड नाही. त्यामुळे पर्यटकांची वाहने अगदी पाणवठ्यापर्यंत जातात. या पाणवठ्यावर अनेक वाघ पाणी पिण्यासाठी येतो. त्यामुळे पर्यटकांसाठी ते धोकादायक ठरू शकते.