जिल्ह्यातील कापूस परजिल्ह्याच्या वाटेवर
By admin | Published: November 30, 2015 02:14 AM2015-11-30T02:14:33+5:302015-11-30T02:14:33+5:30
दीर्घ प्रतीक्षेनंतरही पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाले नाही.
उत्पादकांची चिंंता वाढली : पणनच्या नवीन संकलन केंद्रांची प्रतीक्षा, शेतकरी चालले कापूस घेऊन पुन्हा आदिलाबादकडे
यवतमाळ : दीर्घ प्रतीक्षेनंतरही पणन महासंघाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यातील अनेक भागात सुरू झाले नाही. अशातच स्थानिक व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांंकडे वळविला आहे. याचा फटका बाजार समितीच्या सेस फंडाला बसण्याचा धोका आहे.
जिल्ह्यामध्ये चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. सर्वात मोठे क्षेत्र हे कापूस लागवडीचे आहे. खरीप हंगामातील सर्वात मोठे पीक म्हणून कापसाकडे पाहीले जाते. शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित कापसाच्या खरेदी विक्रीवरच अवलंबून आहे.
पणन महासंघाने ४१०० रूपये क्विंटल कापसाचे दर जाहीर करताच व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले. जिल्ह्यातील शेतकरी ३८०० ते ४००० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. तर परजिल्ह्यातील व्यापारी ४१०० रूपये क्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत.
स्थानिकांच्या तुुलनेत हा दर ३०० रूपयाने अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी परजिल्ह्यात कापूस विक्रीसाठी नेण्यास प्रारंभ केला आहे. यवतमाळचा कापूस अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात जात आहे. यासोबत काही प्रमाणात आंध्र प्रदेशाकडेही कापूस जात आहे.
व्यापाऱ्यांच्या धोरणाने बाजार समितीकडे जाणारा कापूस परजिल्ह्याकडे वळत आहे. यामुळे बाजार समित्यांचा सेस मोठ्या प्रमाणात बुुडणार आहे. याचा फटका बाजार समितीच्या व्यवस्थापनालाही बसणार आहे. (शहर वार्ताहर)