वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर
By Admin | Published: August 29, 2016 01:04 AM2016-08-29T01:04:52+5:302016-08-29T01:04:52+5:30
आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला पुसद तालुका जंगलाने वेढलेला आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पुसद परिसरात वनजमिनीवर वाढले अतिक्रमण
पुसद : आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला पुसद तालुका जंगलाने वेढलेला आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होत आहे. वनजमिनीवर अतिक्रमणाचा सपाटाही सुरू झाला आहे.
वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खंडाळा, मारवाडी, शेंबाळपिंपरी, धुंदी, शिळोणा परिसरात मोठ्या प्रमाणावर वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या परिसरातील वनजमीन शेतीसाठी उपयोगात आणली जात आहे. अगदी पुसद, खंडाळा, मारवाडी या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणही वन अधिकाऱ्यांना दिसत नाही. याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनजमिनीवर अतिक्रमण झाले आहे. त्याचा त्रास परिसरातील स्वत:च्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे. नव्याने झालेल्या अतिक्रमणाने शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचे मार्गच बंद झाले आहे. काही ठिकाणी पूर्णपणे हे मार्ग बदलविण्यात आले आहे. त्याबद्दल वन विभागाकडे अथवा अतिक्रमणधारकांना विचारणा केल्यास धमकी वजा उत्तर मिळत असल्याने शेतकरी बांधव भयभीत झाले आहे.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याबाबत हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणधारकांशी त्यांचे अर्थपूर्ण संंबंध असल्याने वनाधिकारी मूग गिळून गप्प बसतात, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)