दुष्काळानेच दाखविला समृद्धीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:55 PM2018-08-13T21:55:29+5:302018-08-13T21:55:48+5:30
कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.
केवळ दीड महिन्यात या गावात सह हजार ४५६ घनमीटर श्रमदान व एक लाख २४ हजार २६३ घनमीटर यंत्रकाम, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम गावात पूर्ण झाले. यामुळे गावात १३ कोटी ७१ लाख नऊ हजार लीटर पाणीसाठा तयार होऊन मोठ्या प्रमाणात पातळी वाढली. त्यामुळे गावाचा पाणी प्रश्न मिटला. शिवाय सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. खोपडी (बु.) येथील जमीन सुपीक आहे. कधी काळी सिंचनाकरिता मुबलक पाणी मिळत असल्यामुळे खरीप, रबी हंगाम, तसेच फळबाग, भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याअभावी सिंचनाची समस्या जाणवू लागली. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. यामुळे गावाची स्थिती गंभीर बनली.
गेल्या काही वर्षांपासून या भागात पर्जन्यमान चांगले नाही. शिवाय तिन्ही बाजूंनी माळरान डोंगर आणि उतारात गाव, अशी खोपडीची स्थिती असल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी गावात न मुरता बाहेर निघून जात होते. ही बाब गावाच्या दुष्काळाला कारणीभूत असल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले. पाणी अडविल्याशिवाय पातळी वाढणार नाही याची जाणीव त्यांना झाली. नंतर खोपडीची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता निवड झाली. दत्तात्रय राहाणे यांनी गावकºयांच्या साथीने पुढाकार घेतला अन् तेथूनच खºया अर्थाने गावाच्या विकासाला सुरुवात झाली.
पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांनी गावकºयांना स्पर्धेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी गावात बैठक घेऊन गावकºयांचा उत्साह वाढविला. ८ एप्रिलला रात्री बारा वाजता श्रमदानाला सुरुवात झाली. ५00 घनमीटर सीसीटी, तीन शेततळे, २00 मीटर दगडीबांध, १४00 मीटर कंटूर बांध, दहा एलबीएस, तर यंत्राने १७ हजार घनमीटर सीसीटी, १५ शेततळे, तीन गॅबियन बंधारे, दोन सिमेंट नालाबांध, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम पूर्ण झाले. यामुळे १३ कोटी ७१ लाख लिटर पाणीसाठा तयार झाला.
इतर गावांना प्रेरणादायी वाट
गावात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली. आता गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तर सुटलीच, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले. सर्वांनी एकदिलाने परिश्रम घेतले आणि यश संपादन केले. गावकºयांच्या घामाचा हा सुगंध अनेक वर्षे दरवळत राहील. खोपडीवासीयांचा हा प्रवास दुष्काळग्रस्त गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा आहे.
तालुक्यातून प्रथम येण्यासाठी गावकरी या स्पर्धेत ईर्षेने उतरले. मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने हिरमोड झाला. तथापि यानिमित्ताने सर्वांच्या परिश्रमामुळे भरपूर कामे झाली. त्याचा चांगला लाभ गावाला होईल. ही बाब कोणत्याही पुरस्कारापेक्षा निश्चितच मोठी आहे.
- दत्तात्रय राहणे, खोपडी.