आश्रमशाळेचे निवासस्थान कोसळण्याच्या मार्गावर
By admin | Published: February 6, 2016 02:41 AM2016-02-06T02:41:01+5:302016-02-06T02:41:01+5:30
एकात्मिक आदिवासी विभाग पांढरकवडा अंतर्गत शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते.
हिवरी : एकात्मिक आदिवासी विभाग पांढरकवडा अंतर्गत शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. आश्रमशाळेत शिक्षक, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्तीसुद्धा केली जाते. परंतु त्यांना राहण्याचे ठिकाणच असुरक्षित असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. अगदी कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या निवासस्थानांमध्ये येथील शिक्षक, कर्मचारी दिवस काढत आहेत.
मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारीवर्ग या मोडक्या निवासस्थानांमध्ये सध्या राहतात. शासन एकीकडे विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करण्यास सांगत आहे. परंतु विद्यार्थ्यांना घडविणाऱ्याच शिक्षकांची राहण्याची योग्य व्यवस्था नसल्याने ते विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपूर्वी हिवरी येथील आश्रमशाळेत निवासस्थाने बांधण्यात आली. मध्यंतरी आवश्यक ती डागडुजी व रंगरंगोटी केली न गेल्यामुळे आज या निवासस्थानांची दयनीय अवस्था झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने बहुतांश कर्मचारी या ठिकाणी न राहता अप-डाऊन करण्यावर जोर देतात, तर काहींनी गावात घर भाड्याने घेतले आहे. येथील निवासस्थानांच्या भिंतींना तडे गेले आहेत. दारे व खिडक्यांची तावदाने गायब झाली आहे. या निवासस्थानांभोवती मोठ्या प्रमाणात सांडपाणी, घाण व गाजरगवत वाढले आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती आहे. त्यामुळे याठिकाणी निवास करणाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या बाबीकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
मी येथे नुकताच रुजू झालो. त्यामुळे माझ्यापूर्वी असणाऱ्यांनी संबंधित विभागाकडे आश्रमशाळेतील निवासस्थानांबाबत काय पाठपुरावा केला आहे, तो पाहून मी पुढे हा प्रश्न लावून धरणार आहे.
- ए.एस. खिल्लारे, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, हिवरी