आम्हाला अन्न नको, आमचे गाव हवे...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:11+5:30
गेल्या चार दिवसांपासून मजुरांची लोंढेच्या लोंढे वणीमार्गे पुढे निघून जात आहेत. ही बाब लक्षात येताच, प्रशासनाने या सर्वांना आधार देत शहरालगतच्या मॅक्रून स्टुडंट्स अॅकेडमीमध्ये आश्रय दिला आहे. यासाठी पोलीस विभागाची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. जवळपास ७०० मजूर या शाळेत थांबले असून शुक्रवारी शहरातील काही कोळसा व्यावसायिकांनी या मजुरांची अवस्था बघून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, भयगंडाने पछाडलेले मुकूटबन येथील सिमेंट कंपनीतील दीड हजारावर मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठी कंपनी बाहेर पडले आहेत. आणखी एक हजार मजूर कंपनीत थांबून असून ते कुठल्याही क्षणी गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडू शकतात.
गेल्या चार दिवसांपासून मजुरांची लोंढेच्या लोंढे वणीमार्गे पुढे निघून जात आहेत. ही बाब लक्षात येताच, प्रशासनाने या सर्वांना आधार देत शहरालगतच्या मॅक्रून स्टुडंट्स अॅकेडमीमध्ये आश्रय दिला आहे. यासाठी पोलीस विभागाची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. जवळपास ७०० मजूर या शाळेत थांबले असून शुक्रवारी शहरातील काही कोळसा व्यावसायिकांनी या मजुरांची अवस्था बघून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. आम्हाला आता जेवण नसले तरी चालेल, परंतु कोणत्याही परिस्थितीत आमच्या स्वगृही पोहोचायचे असल्याचे या मजुरांनी सांगितले.
मुकूटबन येथे सिमेंट कंपनीचे काम सुरू असून या कंपनीत कंत्राटी पद्धतीवर तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या प्रांतातील जवळपास अडीच हजार मजूर कामासाठी आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर कंपनीतील काम बंद पडले. तेथूनच या मजुरांचे हाल सुरू झाले. कंपनीने या मजुरांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली असली तरी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे मजूर अस्वस्थ आहेत. त्यातच दररोज वृत्तपत्र व वृत्तवाहिण्यांवरून प्रसारित होणाऱ्या कोरोनाच्या बातम्यांमुळे या मजुरांचे कुटुंबियदेखील घाबरून आहेत. त्यांच्या कुटुंबाकडूनही तातडीने गावाकडे परत येण्यासाठी आग्रह धरला जात असल्याने मजूर याठिकाणी थांबायला तयार नाहीत. दुर्दैवी बाब म्हणजे अद्यापही कंपनीतर्फे या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली नाही.
पोलिसातील माणुसकीला सलाम
गेल्या चार दिवसांपासून मुकूटबन येथील सिमेंट कंपनीतील मजूर वणीत पोहोचत आहे. त्यांची परिस्थिती पाहून अस्वस्थ झालेल्या वणी पोलिसांनी त्यांना हवी ती मदत केली. शुक्रवारी ठाणेदार वैभव जाधव यांच्या सुचेनवरून पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, डी.बी.पथकातील सुनील खंडागळे, सुधीर पांडे, पंकज उंबरकर व सहकाऱ्यांनी या मजुरांची नास्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
वादळी वातावरणात पायदळ प्रवास करणार तरी कसा?
सध्या सर्वत्र वादळी वातावरण आहे. अशा परिस्थितीत हे मजूर बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश याठिकाणी पायदळ जाण्यास तयार आहेत. अशा वादळी वातावरणात शेकडो किलोमीटरचा पल्ला हे मजूर गाठतील तरी कसे, असा प्रश्न आहे. आता जिल्हाधिकाºयांनीच या मजुरांची व्यथा लक्षात घेऊन त्यांची गावापर्यंत जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.