स्वच्छता न राखल्यास गुन्हे दाखल करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:29+5:302021-05-14T04:41:29+5:30
पुसद : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या कार्यामुळे कोरोना रोखण्याच्या लढाईत सर्वांचा सहभाग वाढला आहे. आता त्यांनी ...
पुसद : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या कार्यामुळे कोरोना रोखण्याच्या लढाईत सर्वांचा सहभाग वाढला आहे. आता त्यांनी स्वच्छता न राखल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
जैन यांनी कायदा व सुव्यवस्था राखून समाजशीलता, कर्तव्याप्रती प्रामाणिकपणा जोपासला आहे. सोबतच गुन्हेगाराला दंडुका आणि सामाजिक कार्यकर्त्यांना शाबासकी, अशी त्यांची कार्यशैली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कामामुळे पोलिसांप्रती आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहे की नाही, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहे की नाही, यासाठी त्यांनी मागील आठवडाभरापासून अनेक मोहिमा राबविल्या.
या मोहिमेत अनेक व्यापारी, विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह कोरोना टेस्टिंग न करणाऱ्यांना टेस्टिंग, लसीकरण व कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. पोलीस, महसूल आणि नगरपालिकेच्या संयुक्तिक कारवाईनंतर नुकतेच त्यांनी स्टिंग ऑपरेशन करीत ‘शटर बंद, दुकान चालू’, कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर वचक निर्माण केला. जैन यांनी स्वतः खेड्यातील एका नागरिकाचा वेष परिधान करून ग्राहकाच्या भूमिकेतून व्यापाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून कारवाई केली. त्यामुळे आता नागरिक व व्यापारी कोरोना नियमांचे पालन करताना दिसत आहे.
गुरुवारी अनुराग जैन यांनी केलेल्या अनोख्या आवाहनाने सारेजण अवाक् झाले आहे. वसंतनगर भागात पालिकेच्यावतीने स्वच्छता करण्यात आली. नंतर परिसरात घाण आढळली. हे पाहून जैन यांनी तातडीने पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांना घाण साफ करण्यासोबतच नागरिकांनासुद्धा यानंतर अशा पद्धतीने अस्वच्छता आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा त्यांचे कौतुक केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पहिल्यांदाच पोलीस स्वच्छतेबाबत कारवाई करताना दिसत असल्याने अनुराग जैन यांचे कौतुक होत आहे.