हम होंगे कामयाब...शेतकऱ्यांची मुले झेपावली शैक्षणिक प्रगतीकडे
By admin | Published: January 17, 2016 02:22 AM2016-01-17T02:22:59+5:302016-01-17T02:22:59+5:30
कितीही संकटं आली तरी ज्यांचा पुढे झेपावण्याचा निर्धार ठाम असतो, त्यांच्यासाठी रस्तेही आसुसलेले असतात.
अविनाश साबापुरे यवतमाळ
कौन कहता हैं
आसमान मे छेद नही हो सकता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
कितीही संकटं आली तरी ज्यांचा पुढे झेपावण्याचा निर्धार ठाम असतो, त्यांच्यासाठी रस्तेही आसुसलेले असतात. संकटांच्या जंजाळातूनच त्यांच्यापुढे संधी उभी राहते. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या जीवनातही शनिवारी अशीच सोनेरी पहाट अवतरली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण अगदी मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भातील केवळ यवतमाळ जिल्ह्यासाठी भारतीय जैन संघटना आणि लोकमत समूहातर्फे आयोजित या उपक्रमाने शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये ‘हम होंगे कामयाब’ असा आत्मविश्वास पेरला.
पुणे येथील वाघोलीमध्ये उभारण्यात आलेल्या सुसज्ज शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाकडे शनिवारी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील ३८ मुले-मुली रवाना झाली. या मुलांना पाचवी ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या निवास व भोजनासह मोफत देण्यात येणार आहे. केसरिया भवनात झालेल्या या हृद्य सोहळ्यात शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाची भारतीय जैन संघटनेने गंभीर दखल घेतली असून त्यावर शिक्षणाच्या माध्यमातूनच कायमस्वरुपी उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला ‘लोकमत’चेही सक्रिय सहकार्य लाभले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात भारतीय जैन संघटनेचे गेल्या दोन दशकांपासून अव्याहत कार्य सुरू आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुण्यातील वाघोली येथे सुसज्ज असा शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याच प्रकल्पात आता खासदार विजय दर्डा यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यातील ३८ शेतकरीपुत्रांचे आयुष्य घडणार आहे.
३६ तास अखंड धावपळ
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याने भारतीय जैन संघटनेने यवतमाळवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांच्या मुलांना वाघोलीच्या प्रकल्पात दर्जेदार मोफत शिक्षण मिळावे, त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या परिसरातील शेतकरी वर्गाला पुढे न्यावे, त्यांना आत्महत्येसारख्या आत्मघातकी विचारांपासून परावृत्त करावे, हा उदात्त हेतू साध्य करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि लोकमतची संपूर्ण चमू अक्षरश: राबली. अवघ्या ३६ तासांमध्ये कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे सोळाही तालुके पिंजून काढले. तब्बल ६६८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची इत्थंभूत माहिती दिली. पालक कितीही गरीब असला तरी एकाएकी आपल्या मुलांना आपल्यापासून दूर पाठविण्यासाठी राजी होणे कठीण होते. पण भारतीय जैन संघटना आणि लोकमत चमूने त्यांना या प्रकल्पातून त्यांच्या मुलांचे भविष्य कसे उज्ज्वल होऊ शकते, हे पटवून दिल्यानंतर शेतकरी पालक राजी झाले. अशा अखंड प्रयत्नानंतर जिल्ह्यातून ३८ मुले-मुली शनिवारी पुण्यातील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाकडे रवाना झाली.
शेतकऱ्यांच्या मुलांचे उत्साहात स्वागत
जिल्ह्यातील शेतकरीपुत्रांना शनिवारी यवतमाळातून पुण्याकडे शिक्षणासाठी रवाना करण्यात येणार होते. त्यासाठी खेड्यापाड्यांतून भारतीय जैन संघटना आणि लोकमतच्या चमूने या मुलांना यवतमाळातील केसरिया भवनात आणले. कार्यक्रमस्थळी एखाद्या तालुक्यातून आलेले वाहन पोहोचताच आयोजकांकडून त्यांचे उत्साहात स्वागत केले जात होते. त्यांच्या कपाळावर टिळा लावून सन्मानपूर्वक त्यांना मंडपात आणून बसवण्यात आले. आग्रहपूर्वक जेवण देऊन नंतर त्यांची रितसर नावनोंदणी करून घेण्यात आली. त्यांच्या पालकांना व्यक्तीगत भेटून मुलांची अजिबात काळजी करून नका, अशा शब्दात विश्वास दिला जात होता.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतून आलेल्या या मुलांच्या पालकांनीही एकमेकांशी संवाद साधून आपापली दु:खद परिस्थिती सांगितली. प्रकल्पाविषयीची माहिती त्यांनी आयोजकांकडून अधिक विस्ताराने जाणून घेतली.
आजोबांचा आशीर्वाद अन् आईची हळवी साद
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरीपुत्रांना शनिवारी पुण्याच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाकडे पाठविण्यात आले. यावेळी अनेक मुलांसोबत त्यांची आई, आजोबा, मामा, काका असे नातेवाईक उपस्थित होते. मुलांना निरोप देण्यासाठी आलेल्या या नातेवाईकांनी पुढे येऊन बोलावे, अशी विनंती आयोजकांनी केली. तेव्हा बोलणारा प्रत्येक जण हळवा झाला. वणी तालुक्यातून आपल्या दोन नाती घेऊ आलेले मारोती बल्की मात्र खंबिरपणे बोलले. ते म्हणाले, ‘माझ्या मुलाने २७ फेब्रुवारीला आत्महत्या केली आणि ३ मार्चला माझ्या नातीचा (लक्ष्मी) दहावीचा पेपर होता. या दिवसात नातीने रडण्याशिवाय काहीच केले नाही. तरीही दहावीत तिने ६८ टक्के मार्क घेतले. अशा गुणवान मुलींच्या अॅडमिशनसाठी मात्र माझ्या ओळखीच्याच शिक्षण संस्थांनी सतरा-अठरा हजार रुपये मागितले. मी ते देऊ शकलो नाही. पण आज भारतीय जैन संघटना आणि लोकमत देवासारखे धावून आले.’ आयोजकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ते उपस्थित सर्व मुला-मुलींना म्हणाले, ‘पोरांनो, मी तुमच्या सर्वांसाठीच आजोबासारखा आहे. माझे ऐका, या प्रकल्पाचा फायदा घेऊन चांगले शिका. खूप मोठे व्हा!’ तर अनेक मुलांच्या आर्इंनी यावेळी माईक हाती घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला; पण भावना अनावर झाल्याने ‘पोरायले चांगलं शिकवा..’ असंच एखादं वाक्य बोलू शकल्या. शब्द रोखून धरणाऱ्या या मातांना आसवं मात्र रोखता आले नाही. पोरांचे भले होणार हा आनंदही होता अन् पोटचा गोळा नजरेपासून दूर जाणार याची हूरहूरही होती. प्रकल्पाकडे जाणारी मुलेही यावेळी धीराने बोलली. घर सोडण्याचे दु:ख आणि आयुष्य घडण्याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले.
‘जेडीआयईटी’ही येणार मदतीला
भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात (पुणे) यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी ३८ मुले-मुली शनिवारी रवानाही झाले. तेथे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय होणार आहे. मात्र, यातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार आणि पात्रतेनुसार यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातही (ेजेडीआयईटी) शिकण्याची संधी या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांच्या सूचनेवरून उपलब्ध करून देण्यात येईल, असे सुतोवाच ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी केले.