चला, साक्षात शिवकालीन शस्त्रांचे घ्या दर्शन, यवतमाळात आलाय खजिना
By अविनाश साबापुरे | Published: March 8, 2024 05:25 PM2024-03-08T17:25:48+5:302024-03-08T17:27:33+5:30
सध्या महाराष्ट्र शासनातर्फे यवतमाळात चार दिवस महासंस्कृती महोत्सव सुरू आहे.
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज एवढा शब्द जरी उच्चारला तरी महाराष्ट्रीय माणसाला स्फुरण चढते. हीच स्फूर्ती प्रत्यक्षात ज्या शस्त्रांनी अनुभवली होती, त्या शिवकालीन शस्त्रांचा दुर्मिळ खजिना सध्या यवतमाळात आला आहे. कोणत्याही व्यक्तीने यावे, हा खजिना मोफत बघावा, स्पर्शावा अन् स्वराज्याचा स्वाभिमान उरात घेऊन कृतकृत्य व्हावे... असे आवतन सध्या हे शस्त्र देत आहेत.
नाशिकचे (पंचवटी) आनंद शंकर ठाकूर यांनी हा दारुगोळा यवतमाळकरांसाठी आणला आहे. सध्या महाराष्ट्र शासनातर्फे यवतमाळात चार दिवस महासंस्कृती महोत्सव सुरू आहे. त्यात हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. येथे शिवकाळातील तब्बल १८०० शस्त्रे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही सरदारांना, पाहुण्यांना सत्कार म्हणून शस्त्रे भेट दिली, त्यातील काही शस्त्रे या प्रदर्शनात आहेत. ७ मार्चपासून हे प्रदर्शन सुरू झाले असून ११ मार्चपर्यंत दररोज दिवसभर सुरू राहणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना ही शिवकालीन, मोघलकालीन, इंग्रजकालीन शस्त्रे, राजा, रानीच्या वापरातील नक्षीकलेच्या वस्तू पाहण्याची संधी आहे.
कोणती शस्त्रे पाहाल?
या प्रदर्शनात राजारानी तलवार, तेघा तलवार, मुघल तलवार, मराठा तलवार, दोन प्रकारची वाघनखे, वाघाचा लोखंडी पंजा, दुधारी, राजारानी खंजीर, कुऱ्हाडी बंदूक (ठाकणीची बंदूक), दांडपट्ट्याचे १६ प्रकार, भाल्याचे १३० प्रकार, ७० प्रकारच्या कट्यार, बारुददानी, घोड्याच्या नाली, हस्तीदंती खंजीर, जिरेटोप, चिलखत, कासव ढाल, गेंड्याच्या कातडीची ढाल, लोखंडी ढाल, २४ प्रकारचे धनुष्यबाण, गारद्यांच्या छड्या (त्यावर अरबीत लिहिलेले मंत्र), हैदराबादी निजामाची तोफ, हत्तीच्या पायात बांधाचे भलेमोठे कुलूप, भाल्याचा मोर, १० प्रकारच्या गुप्ती, लांबलचक चाबूक, लोखंडी तोफ, उंटावरची तोफ, तोफगोळे, छोटा लाकडी रणगाडा.
याही वस्तू पाहाच
शिवकाळातील दिशादर्शक यंत्र, लढाईवेळी वापरली जाणारी दुर्बीण, राजघराण्यातील अडकित्ते, पानदान, रानीचे दागिने, आरासा, काशाचे ग्लास, पुरातन विळा, पुरातन कुलूपे (कुत्रा कुलूप, माशाचे कुलूप), वजन मापे, शेर, अर्धा शेर (त्यावर विविध संस्थानचे शिक्के), पुरातन मूर्ती आदी.
महाराजांनी ‘माॅडीफाय’ केलेली तलवार !
या प्रदर्शनात मराठा धोप या प्रकारातील तलवार पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मुघल काळात वापरल्या जाणाऱ्या तलवारीला अधिक प्रभावी बनविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यात बदल केला. दुधारी पाते, आगळी वेगळी मूठ असे बदल करून ही तलवार तयार करण्यात आली. महाराजांनी ‘माॅडीफाय’ केलेल्या या तलवारीलाच मराठा धोप म्हणतात, असे या शस्त्रांचे संग्राहक आनंद ठाकूर यांनी सांगितले. याशिवाय वक्र धोप नावाचीही तलवार या प्रदर्शनात आहे. तिला पूर्णपणे वाकविल्यानंतर क्षणार्धात ती पूर्ववतही होते.
गेल्या १५ वर्षांपासून मी गावोगावी फिरून, जुन्या लोकांना भेटून ही शस्त्रे गोळा करीत आहे. त्यांची माहिती मिळवित आहे. महाराष्ट्रात ७०-८० ठिकाणी प्रदर्शन झाले. विदर्भात पहिल्यांदाच आलोय. उदयनराजे भोसले, संभाजीराजे यांचेही मार्गदर्शन असते. त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यावर शासनाने नुकताच एक जीआर काढून शिवकालीन दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित केले आहे. हा शिवकालीन खजिना अधिकाधिक लोकांनी पाहावा, आपला इतिहास जाणून घ्यावा. नाशिकमध्ये या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा मानस आहे.
- आनंद शंकर ठाकूर, शिवकालीन शस्त्रांचे संग्राहक