दारव्हा तालुक्यात अवैध व्यवसायाला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:53+5:302021-09-21T04:47:53+5:30
‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे रान मोकळे : कायदा व सुवस्था बिघडण्याची भीती मुकेश इंगोले दारव्हा : शहरासह ग्रामीण भागात अवैध व्यवसायात ...
‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे रान मोकळे : कायदा व सुवस्था बिघडण्याची भीती
मुकेश इंगोले
दारव्हा : शहरासह ग्रामीण भागात अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी आहे. गावठी दारू, जुगाराच्या अड्ड्यांसह इतर व्यवसायाला ऊत आला आहे. मात्र, कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
काही गावांतील महिला दारूबंदीच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर धडकल्या. अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले. परंतु त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याने व्यावसायिकांना रान मोकळे झाल्याचा आरोप आहे. शहरात काही ठिकाणी जुगार अड्डे सुरू आहे. तेथे क्लबसारख्या सुविधेसह लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. चौकाचौकांत वरळी मटक्याचे काऊंटर उघडण्यात आले आहे. काही जण यासाठी मोबाईलचा वापर करतात.
गावठी, देशी दारूची अवैधरीत्या विक्री केली जाते. पानठेल्यावर गुटखाबंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. आधीच रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री रेती, गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. घरफोडी, चोरी, पाकीटमारीच्या घटनांतही वाढ झाली. शहरात दोन आणि बोदेगाव, लोही येथे मोठ्या चोरीच्या घटना घडल्या. परंतु पोलीस चोरींचा छडा लावू शकले नाही.
ग्रामीण भागात खुलेपणाने गावठी दारूची विक्री होत असल्याने मुले व्यसनाच्या आहारी जात आहे. अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. आता अवैध दारूविक्रीविरुद्ध महिला सरसावल्या आहे. तरोडासह काही गावात महिलांनी एल्गार पुकारला. पोलीस ठाणे गाठून कारवाईची मागणी केली. लाला पांडे, जमन काजी, शेख जावेद, अनिल लोथे आदींनी अवैध धंद्याबाबत लेखी तक्रार केली आहे.
बाॅक्स
लाखो रुपयांची सेटिंग
जुगार अड्डे, रेती वाहतूक, वरळी मटका तसेच गुटखा विक्रीसाठी काहींनी लाखो रुपयांची सेटिंग केली असल्याचे बोलले जाते. यामुळे प्रतिमा मलीन होण्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अवैध धंदे बंद करण्यासाठी काही ठोस पाऊले उचलले जातात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोट
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना थारा नाही. उत्सवाच्या बंदोबस्तानंतर याविरुद्ध मोहीम उघडून कारवाई करण्यात येईल.
सुरेश मस्के, ठाणेदार, दारव्हा