दोन घासाच्या शोधात मृत्यूनेच घेतला घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:45 PM2018-12-09T21:45:23+5:302018-12-09T21:46:56+5:30
गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव/वणी : गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. अशाच बेरोजगारांचा एक जत्था चंद्रपुरात गेला होता. तेथून परतताना या भुकेल्यांचा शनिवारी रात्री मृत्यूनेच घास घेतला. मृत्यू तर क्रूर ठरलाच, पण त्याहूनही बेमुर्वत ठरले स्थानिक प्रशासन. मजुरांच्या मृत्यूनंतरही माळवागदची वास्तपूस्त करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही.
या अपघातात महागाव तालुक्यातील माळवागदचे चार, उटीचा एक, वणीचे सहा अशा ११ जणांचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील पाचही मृतक एकाच कुटुंबातील आहेत. अमोल दगडू हटकर, वनिता गजानन नवघरे, कुसूम अशोक हटकर, क्रिश अशोक हटकर (लहान मुलगा) सर्व रा. माळवागद, गजानन कोंडबा नवघरे रा. उटी, चंंद्रपुरातील शोभा सुभाष निब्रड (५५), पार्वतीबाई कैलास गेडाम (४५), छाया दादाजी लोहकरे (४०), हातूनबी हमीद खॉ पठाण (३५), संगीता दिनेश टेकाम (३८) रा. रंगनाथनगर, सुजित बाळू डवरे (३५) रा. लालगुडा यांचा मृत्यू झाला.
‘लोकमत’चे महागाव प्रतिनिधी माळवागद गावात पोहोचले असता गावात अत्यंत शोकाकूल स्थिती आढळली. या गावातील अनेक जण रोजगारासाठी परगावी गेलेले आहेत. चंद्रपुरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माळवागद येथील विठ्ठल गव्हाणे, रवी कांबळे यांनी रातोरात गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही प्रशासन मात्र जराही हलले नाही.
कोरपना येथील विदर्भ कॉटन जिनिंगमध्ये काम मिळेल, या आशेने महागाव तालुक्यातील मजूरवर्ग गेला होता. तर वणी परिसरातील जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे येथील मजूरही एका कंत्राटदारामार्फत चंद्रपूर जिल्ह्यात मजुरीसाठी गेले होते. मात्र काम उपलब्ध नसल्याने ही मंडळी एमएच २९ टी ८५८२ क्रमांकाच्या वाहनाने स्वगावी परत येत होती. विरुद्ध दिशेने भरधाव येणाºया एमएच २९ ई १६८३ क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन मजुरांच्या वाहनावर धडकला.
अपघाताचे वृत्त कळताच विदर्भभरात हळहळ व्यक्त होत असताना स्थानिक प्रशासनात मात्र कमालीची उदासीनता पाहायला मिळाली. घटनेची माहिती मिळूनही प्रशासनाने त्याबद्दल जराही खातरजमा केली नाही. रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत माळवागदला कोणताही अधिकारी, कर्मचारी फिरकला नव्हता. प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे पाहून गावकºयांनी संताप व्यक्त केला.
माळवागद येथे एकाच चितेवर मुखाग्नी
माळवागद येथील चौघांचे मृतदेह दुपारी चंद्रपुरातून गावात पोहोचले. माळवागदच्या तळ्याच्या पायथ्याशी सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. चौघांनाही एकाच चितेवर अशोक हटकर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी गोपाळ समाज हित महासंघ प्रभाकर तपासे, जिल्हाध्यक्ष रमेश महाजन, ययाती नाईक, गुलाबराव जाधव, अब्दूल वहाब, अशोक जाधव, नामदेवराव जाधव, नरेंद्र जाधव, मोहन चव्हाण, सरपंच मधुकर राठोड, कान्हा चव्हाण, विठ्ठल गव्हाणे, रवी कांबळे उपस्थित होते. तर उटी येथील मृतक गजानन नवघरे यांचा मृतदेह सायंकाळपर्यंत गावात पोहचायचा होता.
पाच जणांच्या मृत्यूने वणी शहर हळहळले
या भीषण अपघातात वणीच्या रंगनाथनगरातील पाच महिलांचा बळी गेला. तर लालगुडा परिसरातील इसमही दगावला. अपघाताची माहिती शनिवारी रात्री १२ वाजता मिळताच संपूर्ण वार्ड जागा झाला. मिळेल त्या वाहनाने अनेक जण चंद्रपूर जिल्ह्यातील घटनास्थळाकडे रवाना झाले. रविवारी दुपारी २ वाजता मृतदेह वणीत पोहोचले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगनाथनगरातून एकामागून एक अंत्ययात्रा निघाल्या. हे दृश्य बघून वणी शहरवासीयांचे काळीज हेलावले.