तणनाशक १२ हजार रूपये लिटरच्या घरात
By admin | Published: July 22, 2014 12:04 AM2014-07-22T00:04:19+5:302014-07-22T00:04:19+5:30
मजुरीचे वाढते दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी आता तणनाशकांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. मात्र तणनाशकाचे दर १२ हजार रूपये लिटरच्या घरात पोहचल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
शेतकरी धास्तावले : मजुरीही आवाक्याबाहेर
यवतमाळ : मजुरीचे वाढते दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी आता तणनाशकांचा सर्वाधिक वापर करीत आहेत. मात्र तणनाशकाचे दर १२ हजार रूपये लिटरच्या घरात पोहचल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
परतीचा पाऊस, गारपीट आणि दुबार, तिबार पेरणी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. यावर मात करीत त्यांनी यावर्षीच्या हंगामाची तयारी केली. मात्र आता त्यांच्यापुढे मजुरांच्या वाढत्या दराने गंभीर प्रश्न नर्माण केले आहे. शेतशिवारात पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण निघाले आहे. तण नियंत्रणासाठी मजुरीचे दर १०० रूपयांवर पोहोचले आहेत. तर मजुराला पर्याय असणाऱ्या तणनाशकाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या बाजारात १६५० ते १२ हजार रूपये लिटरपर्यंतचे तणनाशक बाजारात आले आहेत. या प्रत्येक तणनाशकांचे स्वतंत्र गवत नियंत्रणाची गुणवत्ता आहे. सर्वच प्रकारचे गवत शेतात असल्याने मोठे पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहे. त्याखेरीज शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. तण नियंत्रणासाठी लागणारे पैसे आणायचे कोठून, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर)