शेतात तण वाढले, मात्र मजूरच मिळेना
By Admin | Published: July 16, 2016 02:47 AM2016-07-16T02:47:32+5:302016-07-16T02:47:32+5:30
यंदा निसर्गाची साथ दिसत असून गत काही दिवसांपासून पिकांना पोषक पाऊस कोसळत आहे.
शेतकरी त्रस्त : घरची मंडळी राबतात शेतात
पुसद : यंदा निसर्गाची साथ दिसत असून गत काही दिवसांपासून पिकांना पोषक पाऊस कोसळत आहे. गत आठवड्यात तर सलग पाच दिवस पाऊस कोसळला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी पिकात वाढलेले गवत पाहून धडकी भरत आहे. काही ठिकाणी तणनाशकांचा वापर केला जात असला तरी अनेक गावत मजूरच मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या घरच्या मंडळींना शेतात राबण्याची वेळ आली आहे.
एक काळ असा होता की शेतकरी आणि शेतमजूर एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. शेतमजुरांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत असे. एकाच शेतकऱ्याच्या घरी पिढ्यान्पिढ्या शेतमजुरी केली जात असे. त्यातूनच सालदार ही पद्धत रुढ झाली. वर्षभराचा करार करून ठराविक रक्कम व धान्य सालदाराला दिले जात होते. या बदल्यात सालदार सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत शेतमालक सांगेल ती कामे करीत होता. शेतकरीसुद्धा शेतीकामासाठी सालदाराला घरच्या व्यक्तीप्रमाणे वागवत होता. शिक्षणाचा अभाव, प्रचंड गरिबी यामुळे सालाने राहणे त्या काळी गरजेचे झाले होते. परंतु आता खेडी बदलत चालली आहे. दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहे. शहरे वेगवान वाहनांमुळे जवळ आली आहे. गावागावापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपऱ्या पोहोचल्या आहे. त्यामुळे खेड्यातील माणूस आता शेतीतील निम्नदर्जाची कामे करायला तयार नाही. त्यातच शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे धान्यही यासाठी कारणीभूत ठरत आहे.
सकाळी मिळालेला मजूर सायंकाळपर्यंत कामावर राहीलच याची खात्री नाही. शेतावर काम करण्याऐवजी लगतच्या शहरात जावून प्रचंड कष्टाची कामे करतील. शेतीची अनेक कामे आता यंत्राच्या सहाय्याने केली जात आहे. मात्र निंदनासारख्या कामासाठी मजुराच्या शोधात असतो. (तालुका प्रतिनिधी)