वजनमाप निरीक्षक कार्यालय हाकलतेय उंटावरून शेळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 09:14 PM2019-07-13T21:14:26+5:302019-07-13T21:14:47+5:30

येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत असून अनेक ठिकाणी ग्राहकांची सर्रास लूट होत असताना संबंधित व्यापाऱ्यांच्या वजनमापांची पडताळणी करण्याचे कामदेखील या कार्यालयाकडून केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

Weighing from the weight inspector's office | वजनमाप निरीक्षक कार्यालय हाकलतेय उंटावरून शेळ्या

वजनमाप निरीक्षक कार्यालय हाकलतेय उंटावरून शेळ्या

Next
ठळक मुद्देग्राहकांची लूट : वजनात फेरफार, अनेक ठिकाणी केला जातो दगडांचा वापर

म.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील नांदेपेरा मार्गावर असलेल्या वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडून सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे. या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत असून अनेक ठिकाणी ग्राहकांची सर्रास लूट होत असताना संबंधित व्यापाऱ्यांच्या वजनमापांची पडताळणी करण्याचे कामदेखील या कार्यालयाकडून केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
गंभीर बाब ही की, काही छोटे व्यावसायिक वजन करताना प्रमाणित वजनाऐवजी दगडांचा सर्रास वापर करीत आहे. यातून ग्राहकांची लूट केली जात आहे. एखाद्या ग्राहकाने यावर आक्षेप घेतल्यास व्यावसायिक व ग्राहकात वादावादीचे प्रसंगही घडून येत आहेत. अनेक व्यावसायिकांनी तर प्रमाणित वजनमापेच घेतली नसल्याचे दिसून येत आहे. मात्र या कार्यालयाकडून या व्यावसायिकांविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. या कार्यालयाने शहरात काही परवानाधारक एजंटांची नेमणूक केली असून त्यांना दुरूस्तकार असे गोंडस नाव देण्यात आले आहे. नियमानुसार कार्यालयातील जबाबदार अधिकाºयाने वजने प्रमाणित करताना प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे. परंतु हे दुरूस्तकार बाहेरच्या बाहेर वजने प्रमाणित करून देत असल्याचे एका जाणकाराने ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयातील प्रयोगशाळेत वजनांचे प्रमाणिकीकरण झालेच नसल्याचे सांगितले जाते. या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीदेखील चंद्रपुरातूनच कारभार पाहत असल्याची माहिती आहे. १५ दिवसातून एखादवेळी हा अधिकारी वणी कार्यालयात चक्कर मारतो. त्यांच्या गैरहजेरीत अनेक ग्राहक वजनाविषयीच्या तक्रारी घेऊन या कार्यालयात जातात. मात्र याठिकाणी अधिकारीच गैरहजर राहत असल्याने तक्रार करावी कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. या कार्यालयात हजेरी रजीस्टर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यावर अन्य कर्मचाºयांच्या स्वाक्षºया असल्या तरी अधिकाºयांच्या मात्र स्वाक्षºयाच दिसून येत नाहीत.
यासंदर्भात या कार्यालयातील वजनमापे निरीक्षक स.बा.कटके यांच्याशी संपर्क साधला असता, मी मागील १० दिवसांपासून रजेवर आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यालयाचा प्रभार पांढरकवडा येथील निरीक्षकांकडे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या महिन्याच्या अखेर आपली सेवानिवृत्ती आहे. या विभागाचे संपूर्ण काम आॅनलाईन झाल्याने मी आपली उपस्थिती आॅनलाईनच दर्शवित असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागीलवर्षी बाजार समितीत वजनकाट्यात फरक आढळून आल्याने स्थानिक शिवसेना नेत्याने या विषयात वजनमापे निरीक्षकांना चांगलेच धारेवर धरले होते. या कार्यालयाकडून केवळ खानापूर्ती करण्यासाठी नाममात्र कारवाया केल्या जातात. अनेक कारवायात एजंटमार्फत सेटींग केली जात असल्याचीही चर्चा आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी आहे.

Web Title: Weighing from the weight inspector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.