यवतमाळ जिल्ह्यात आईबाबांनी केले चार कन्यारत्नांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:27 PM2018-08-27T12:27:24+5:302018-08-27T12:29:30+5:30
लेक वाचवा असा संदेश सरकारी स्तरावरून दिला जात असला तरी सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्ये आजही मुलांसाठीच नवस बोलले जात आहे. मात्र एका मजूर दाम्पत्याच्या पोटी रविवारी एकाच वेळी चार मुली जन्मास आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लेक वाचवा असा संदेश सरकारी स्तरावरून दिला जात असला तरी सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्ये आजही मुलांसाठीच नवस बोलले जात आहे. मात्र एका मजूर दाम्पत्याच्या पोटी रविवारी एकाच वेळी चार मुली जन्मास आल्या. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या गरीब आईबाबांनी चारही कन्यारत्नाचे अत्यंत आनंदाने स्वागत केले.
राणी प्रमोद राठोड (२२) रा. चिखली (रामनाथ) ता. दारव्हा या मातेने चार मुलींना जन्म दिला. राठोड दाम्पत्याला पहिली दोन वर्षाची मुलगी आहे. दुसऱ्या अपत्यासाठी राणी गर्भवती होती. तिची सोनोग्राफी यवतमाळात खासगीत करण्यात आली. त्यावेळी गर्भात चार अपत्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून राठोड दाम्पत्याला धक्काच बसला. रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबापुढे यक्षप्रश्न उभा ठाकला. ही समस्या घेऊन हे दाम्पत्य महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना भेटले. मंत्र्यांनी पुढाकार घेत शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांशी चर्चा केली. राणीची प्रकृती बेताची असल्याने चार जीवांचा गर्भ तिला झेपेल काय याचीही चर्चा झाली. शेवटी स्त्री रोग विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण यांनी हे आव्हान स्वीकारले. डॉ. श्रीकांत वराडे, डॉ. पूनम कुळसंगे, डॉ. भवय्या आणि डॉ. प्रशिव शाह यांनी राणीची दोन महिने काळजी घेतली. याशिवाय रुग्णसेवक विकास क्षीरसागर, वक्की पोरटकर, पवन शेंद्रे, चंदन नीत, जयपाल पवार, जगदीश कोटरे आदींनी वारंवार आवश्यक ती मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नाला रविवारी दुपारी यश आले. राणीने एक नव्हे तर चार मुलींना जन्म दिला. वैद्यकीय महाविद्यालयातील ही पहिलीच घटना आहे. राज्यमंत्री संजय राठोड, संतोष ढवळे यांनी रुग्णालयात येऊन माता व मुलींची विचारपूस केली. यावेळी राणी राठोड हिने संजय राठोड यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. पहिली मुलगी असताना आणखी चार मुली झाल्याने पिता म्हणून प्रमोद यांना अत्यानंद झाला. रोजमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या प्रमोद यांनी याबाबत कुठलीही तक्रार केली नाही. उलट सर्वांचे आभार मानत आनंदच व्यक्त केला.