विश्वशांती रथयात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:58 PM2018-05-03T21:58:35+5:302018-05-03T21:58:35+5:30
तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तमिळनाडूतील कृष्णगिरी तिर्थक्षेत्रावरील पद्मामावती मंदिरातून निघालेली विश्वशांती रथयात्रेचे यवतमाळ शहरात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा देशातील ११ राज्यांची परिक्रमा पूर्ण करणार असून जगातील सर्वात उंच कृष्णगिरी तीर्थक्षेत्रावर भगवान पार्श्वनाथांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
कृष्णगिरी तीर्थामधील राष्ट्रसंत यतीवर्य डॉ. वसंत विजयजी म.सा. यांच्या मार्गदर्शनात ही विश्वशांती रथयात्रा काढण्यात आली आहे. या रथयात्रेचे सारथ्य आनंद सालच्या हे करीत आहेत. तमिळनाडूतील कृष्णगिरी तीर्थक्षेत्रावर ४२१ फुट उंच मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. या ठिकाणी ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भगवान पार्श्वनाथाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तत्पूर्वी २६ जानेवारी २०१९ ला ही विश्वशांती रथयात्रा परत तमिळनाडूत पोहोचणार आहे.
या विश्वशांती रथयात्रेने आतापर्यंत तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असा प्रवास करून महाराष्ट्रात आली आहे. राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली आणि वाशिम मार्गे ही रथयात्रा यवतमाळात आली आहे. ही विश्वशांती रथयात्रा वणी-चंद्रपूर मार्गे पुढे जाणार आहे.
यवतमाळात रथयात्रेचे बुधवारी थाटात स्वागत करण्यात आले. वाघापुरातील दिगंबर जैन मंदिरातून निघालेली रथयात्रा शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत केसरिया भवनात विसर्जित झाली. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. नेताजी चौकात रथयात्रेचे देव पूजन करण्यात आले. यावेळी महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रथयात्रेतील भगवान पार्श्वनाथांचे दर्शन घेतले. या रथयात्रेत छोटे आणि मोठे दोन कलश ठेवण्यात आले आहे. आचार्यांनी अभिमंत्रित केलेला १०८ तीर्थातील वासक्षेप यामध्ये ठेवण्यात आला आहे. हा कलश शहरातील बांधवांकडे नेण्यात आला. त्या ठिकाणी जाप पार पडला.
जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघटनेने नेताजी चौकात रथयात्रेचे स्वागत केले. यावेळी श्वेतांबर आणि दिगंबर जैन समाज बांधव उपस्थित होते. दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष शेखर बंड, प्रसन्न दफ्तरी, राजेंद्र खिवसरा, लहरभाई नागडा, संजय कोचर, वीरेंद्र मुथा, सचिन कोठारी, राजू जैन, भागचंद दर्डा, भवरीलाल बोरा, नंदकुमार बोरा, डॉ. रमेश खिवसरा, यग्नेश धोराजीवाला, मिनल सेठ, जित सेठ, अखिलभाई धरमसी, संदीप तातेड, विजय कोटेचा, दिलीप लोढा, विजू लोढा, कुमार नागडा, श्याम भंसाली, जैन महिला मंडळ, केसरिया महिला मंडळ, गोविंदभाई डाबरीवाल आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.