जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:52 PM2018-07-11T21:52:34+5:302018-07-11T21:53:49+5:30

जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

Well-known water tanks in Ganeshwadi with Japanese technology | जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

googlenewsNext
ठळक मुद्दे‘रिचार्ज शाप’चा प्रयोग : जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ३० फुटांपर्यंत पाणी खेचले

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला. यामुळे गावकरी आता सुखावले असून ही पद्धत दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
कळंब तालुक्यातील गणेशवाडी हे गाव कायमस्वरूपी दुष्काळी. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावातील नागरिक दुष्काळाच्या झळांनी चांगलेच त्रस्त झाले. त्यातच टँकरने पाणी पुरवठा करताना रस्त्याचीही अडचण. अशा या गावात पाणी टंचाई कायम स्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय भूजल सर्वेक्षण विभागाने घेतला. गावातून गेलेल्या नाल्यावर भेगाळलेल्या खडकांचा शोध घेतला. त्याचा अभ्यास करण्यात आला. या खडकाच्या मदतीने गावातील भूजल स्रोतात भर घालणे शक्य होणार असल्याचे निदर्शनास आले. या नाल्यावर १६ रिचार्ज शाप तयार करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पुनर्भरण झाले. याचा फायदा पहिल्याच पावसात दिसून आला. गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. या विहिरीवरून आता ओलित करून सिंचन करण्याची सुविधाही केली जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत खेचण्याचा हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी झाल्याने त्याची अंमलबजावणी इतरही ठिकाणी केली जाणार आहे. तसेच या प्रयोगाची दखलही राज्य शासनाने घेतली आहे.
काय आहे ‘रिचार्ज शाप’?
रिचार्ज शाप ही जलपुर्नभरणाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये ३० फुटापर्यंत खोल पाणी नेता येते. हे पाणी वाहून जाणाऱ्या खडकापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी बोअरवेलचा जाळीदार केसिंग पाईप बसविला जातो. त्या भोवताल दगड आणि वाळू भरली जाते. या केसिंगला झाकण बसविले जाते. त्याला छिद्र असतात. पावसाचे पाणी या छिद्रांमधून थेट जमिनीत खेचले जाते. यामुळे पाणी वाहून न जाता थेट जमिनीत साठविले जाते.

रिचार्ज शापने गणेशवाडीचा कायापालट झाला. आज गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहºयावर आनंद दिसत आहे. राज्य शासनाने याची दखल घेतली असून हे काम खर्चिक असले तरी दुष्काळावर मात करणारे आहे.
-राजेश सावळे
वरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ, भूजल सर्वेक्षण विभाग.

Web Title: Well-known water tanks in Ganeshwadi with Japanese technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.