साखर कारखाना वाचविण्याची धडपड आताच का?
By Admin | Published: January 21, 2016 02:21 AM2016-01-21T02:21:00+5:302016-01-21T02:21:00+5:30
सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही.
महागाव : सुधाकरराव नाईक साखर कारखाना गत चार वर्षांपासून बंद आहे. मात्र या काळात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केले नाही. आता राज्य बँकेने साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि खडबडून जागे झालेल्या काहींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कारखाना वाचविण्यासाठी आताच का धडपड, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.
महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक साखर कारखाना २०१२ सालापासून बंद आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेतकरी, कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहे. गेल्या चार वर्षात कारखाना सुरू करावा, यासाठी कुणीही प्रयत्न केले नाही. कारखाना सुरू असताना आंदोलने करून प्रशासनाला सळो की पळो करण्यात आले. त्यानंतर वारणा ग्रुपने भाडेतत्त्वावर कारखाना घेतल्यानंतर त्यांनाही हा कारखाना अर्ध्यावरच करार मोडावा लागला. त्यानंतर कारखान्याला कायमचे टाळे लागले ते आजपर्यंत कायम आहे. दरम्यान, थकीत कर्जासाठी राज्य सहकारी बँकेने हा कारखाना आपल्या ताब्यात घेतला. कारखाना विकण्याची नोटीस काढली. दरम्यानच्या चार वर्षात कुणीही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा आंदोलने केले नाही. मात्र कारखाना विक्रीला निघत असल्याचे पाहून अनेकांनी आंदोलनाची भाषा केली. परंतु त्यातही नेते मात्र बाजूलाच दिसत आहे.
कारखाना वाचविण्यासाठी बैठा सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहालाही शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. एकही नेता बैठा सत्याग्रहाकडे फिरकला नाही. आता आमदार मनोहरराव नाईकांना निवेदन देवून कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे निवेदन दिल्या गेले. मात्र हा कारखाना विक्रीस काढल्यावर जाग का आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारखाना सुरू व्हावा, अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यासाठी राजकारणविरहीत प्रयत्न होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)