पहिल्या कृषिमंत्र्यांना काय वाटत असेल..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:11 PM2018-04-10T23:11:56+5:302018-04-10T23:11:56+5:30
देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशाला पहिला कृषिमंत्री आपल्या विदर्भाने दिला. त्याच भाऊसाहेबांची मंगळवारी पुण्यतिथी होती. अन् नेमकी त्याच दिवशी जिल्ह्यात एका कर्त्या कास्तकाराने शेतातच प्राण सोडला. एकीकडे भाऊसाहेबांना अभिवादन केले जात असताना दुसरीकडे भाऊसाहेबांचाच कास्तकार गडी मात्र दुनियेला कंटाळून जगणे झिडकारून निघून गेला... जाताना चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या आत्महत्येला जबाबदार राहतील, असे अंत:करणाचे बोल तोडक्या मोडक्या शब्दात लिहून गेला... हा विरोधाभास, विसंगती की कृषिव्यवस्थेचे व्यंग!
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी गावातून मंगळवारी एका शेतकऱ्याचे कलेवर यवतमाळात पोहोचले. त्याने गळफास घेतला मग विष घेतले अन् कायमचा गेला. यवतमाळात त्यावेळी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम सुरू होते. सोशल मीडियातून पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन करणारे संदेश फिरत होते. अन् त्याचवेळी भाऊसाहेबांच्याच कास्तकार गड्याने प्राण त्यागल्याचे वृत्तही धडकले.
भाऊसाहेबांनी शेतीच्या उत्थानासाठी अन् शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी सारे काही केले. स्वत: साडेचारशे एकर जमीन देऊन विदर्भात कृषी विद्यापीठ आणले. त्याच कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषी विज्ञान केंद्र आले आहे.
त्याच विद्यापीठांतर्गत यवतमाळात कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालय आले आहे. याच दोन वास्तूंच्या पुढे मंगळवारी राजूरवाडीच्या शेतकऱ्याचे कलेवर उत्तरीय तपासणीसाठी आले होते. एकीकडे शेतकºयांसाठी जीवन अर्पण केलेल्या पहिल्या कृषिमंत्र्यांना अभिवादन अन् दुसरीकडे शेतकºयाची आत्महत्या, असे भयंकर चित्र यवतमाळात मंगळवारी पाहायला मिळाले. विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी स्वप्न पेरणाऱ्या कृषिमंत्र्यांना काय वाटले असेल..!
कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ ?
शेतकºयांच्या आत्महत्यांची आता जिल्ह्याला नव्हाळीच उरलेली नाही. मात्र, पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावरही सरकारी पक्षाचे काळीज हलले नाही. कृषी विज्ञान केंद्रापुढे असलेल्या शवविच्छेदन गृहात दिवसभर शंकर चायरे यांचा मृतदेह पडून होता. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने तिथे ठिय्या दिला. मात्र नरेंद्र मोदींचे नाव घेऊन शेतकरी गेलेला असतानाही सरकार पक्षातील आमदार, खासदार, पालकमंत्री चार पावलावर पोहोचू शकले नाही. देशाच्या पहिल्या कृषिमंत्र्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन करणारी आजची कोरडी व्यवस्था कितपत शेतीनिष्ठ उरली, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.