हा काय खेळ लावलाय?, पुसदचे ज्येष्ठ नागरिक संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:40 AM2021-03-06T04:40:17+5:302021-03-06T04:40:17+5:30
पुसद : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी केल्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात ५ वाजेपर्यंत रांगेत उभे राहूनही ज्येष्ठांना ...
पुसद : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी केल्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात ५ वाजेपर्यंत रांगेत उभे राहूनही ज्येष्ठांना लस मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत हा काय खेळ लावलाय, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठांना गुरूवारी ‘उद्या या’ असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी हा काय खेळ लावला आहे, असा प्रश्न विचारला. येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. को-विन पोर्टलवरील नोंदणीचा कागद दाखवूनही रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी ज्येष्ठांना अडवून ठेवले होते. त्यामुळे उन्हाच्या वाढत्या काहिलीसोबत ज्येष्ठांच्या रागाचा पाराही चढला होता.
रुग्णालयात सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त व्यक्तिंची लस घेण्यासाठी मोठी झुंबड केली होती. मात्र, को-विन पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी दिसत नसल्याने लसीकरण प्रक्रिया सुरू होत नव्हती. त्यातून केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. गर्दीमुळे सुरक्षित अंतराचा नियमही पाळला जात नव्हता. कोणीही रुग्णालयात येऊन ज्येष्ठ नागरिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतरही गोंधळाचे वातावरण कायम होते. लस घेण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी केल्यावर उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सकाळची अपॉईंटमेंट मिळाली; पण आम्हाला लसीकरण केंद्रात सोडले नाही. उद्या येऊन नोंदणी करा, असे सांगितले जात आहे, असे नगरसेविका स्वाती सुभाष पदमवार यांनी सांगितले.