असे घडले उमरीचे हुतात्मा स्मारक..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाराष्ट्रातील अनेक हुतात्मा स्मारकांमध्ये उमरीच्या स्मारकाला फार मोल आहे. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत देशासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्रातील अनेक हुतात्मा स्मारकांमध्ये उमरीच्या स्मारकाला फार मोल आहे. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत देशासाठी प्राण देणाऱ्या यशवंत पाळेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बांधले गेले. स्मारकाच्या जन्माचा इतिहास गावकरी सांगतात, तो असा...
मूळचे धमक बोलोरा (आता जिल्हा अमरावती) या गावचे रहिवासी असलेले पाळेकर कुटुंब उमरी येथे कामानिमित्त स्थायिक झाले होते. यशवंत लुडबाजी पाळेकर हे त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. पेशाने आयुर्वेद डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्यासोबतच वामणराव गोविंदराव चव्हाण, विठ्ठलराव तुकाराम गिरमे हेही चळवळीत होते. ब्रिटिशांविरुद्धच्या कारवायांमुळे त्यांना अमरावतीच्या कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. कारागृहात ब्रिटिशांच्या जुलमांना यशवंत पाळेकर यांनी अजिबात जुमानले नाही. त्यातच २६ सप्टेंबर १९४२ रोजी त्यांना वीरमरण आले. देश स्वतंत्र झाल्यानंतर पाळेकर यांच्यासारख्या अनेक शहिदांचे स्मरण भावी पिढ्यांना राहावे, यासाठी हुतात्मा स्मारकांची कल्पना पुढे आली. त्यासाठी शासनाने गावोगावी जागांचा शोध सुरू केला. अशावेळी उमरीतील रामचंद्र धोंडबाजी गांगेकर यांनी अडीच एकर जमीन दान दिली.
हे स्मारक नव्हे मंदिर
वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन आता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग सांभाळत आहे. विशेष म्हणजे, शहीद यशवंत पाळेकर यांचे सहकारी वामनराव चव्हाण यांचे चिरंजीव हरिभाऊ चव्हाण यांनीच येथे चौकीदार म्हणून जबाबदारी स्वीकारली. वडील वामनराव यांच्याकडून मिळालेली स्वातंत्र्य चळवळीतील स्थानिक घडामोडींची माहिती हरिभाऊ सांगतात. ‘आम्ही देशाची सेवा केली, तू या स्मारकाची मनोभावी सेवा कर’ असा मंत्र मला माझ्या वडिलांनी दिल्याचे हरिभाऊ म्हणाले. गावापासून काहिसे दूर हे स्मारक असल्याने काही जण येथे पार्टी करण्याच्या बेतात होते. मात्र आम्ही अशा लोकांना खडसावून परत पाठविले. हे स्मारक आमच्यासाठी मंदिर आहे, असेही चव्हाण म्हणाले.
म्हणून नाव ठेवले सत्यदेव
यशवंत पाळेकर यांचा मुलगा सत्यदेव आज अमरावती जिल्ह्यातील मूळ गावात आहे. १९४२ च्या सुमारास जेव्हा ब्रिटीश पोलिसांनी यशवंत पाळेकर यांना पकडून नेले तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती. ‘मी सत्याग्रहासाठी कारागृहात चाललो, मुलगा झाल्यास त्याचे नाव सत्यदेव ठेवा’ असे कुटुंबीयांना सांगून यशवंतराव गेले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी यशवंतरावांच्या मुलाचे सत्यदेव असे नामकरण केल्याची आठवण हरिभाऊ चव्हाण यांनी सांगितली.
कोरोनामुळे यंदा कार्यक्रमावर मर्यादा
उमरीच्या स्मारकात दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद क्रांतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करते. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करीत त्यांच्या कुटुंबीयांचाही सन्मान केला जातो. मात्र यंदा कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे कार्यक्रमावर मर्यादा आली आहे. केवळ आठ-दहा लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मात्र क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषदेने येथे चोख स्वच्छतेची कामे केली.
बाबूजींचा जिव्हाळा
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी उमरी येथील शहीद स्मारकाला वेळोवेळी भेटी दिल्या. आॅगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने या स्मारकाच्या ठिकाणी जिल्ह्यातील बºयाच मान्यवरांनी येऊन मार्गदर्शन केले. त्यात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी अग्रस्थानी आहेत, असे हरिभाऊ चव्हाण यांनी सांगितले.
शहीद स्मारक परिसरात सौंदर्यीकरणासाठी २७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हे काम प्रगतिपथावर असले तरी वाळू उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. अंतर्गत रस्ते व विविध सुविधांची निर्मिती तेथे केली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेला पुढील देखभालीसाठी हस्तांतरीत केले जाईल.
- धनंजय चामलवार
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ
उमरीच्या स्मारकाची देखभाल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दरवर्षी एक लाख रुपयांचा निधी आरक्षित केला जातो. मागील वर्षी सौंदर्यीकरणासाठी २७ लाख ९२ हजारांचा निधी आला. मात्र काही कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने तो परत घेतला. तरीही जिल्हा परिषदेमार्फत येथे विविध कामे सुरू आहेत.
- राजू सुरकर
प्रभारी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग.
अन् कलेक्टर आले होते पैदल..!
या स्मारकाचे भूमिपूजन ९ ऑगस्ट १९८१ ला झाले. भूमिपूजन बरोब्बर सकाळी १० वाजताच झाले पाहिजे असा तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांचा आग्रह होता. म्हणून सारे मान्यवर धावपळ करीत होते. यवतमाळचे तत्कालीन कलेक्टर भावे हेही उमरीकडे वेळेवर पोहोचण्यासाठी निघाले, मात्र रस्ता कच्चा होता, त्यातच मुसळधार पाऊस बरसत होता.. गाडी पुढे जाणेच कठीण बनले. अखेर मुख्य मार्गावर गाडी उभी ठेवून कलेक्टर भरपावसात पैदल चालत भूमिपूजन स्थळी पोहोचले. आणि अगदी वेळेवर भूमिपूजन झाले. त्यावेळी केवळ १८ वर्षाच्या एका मुलाने या स्मारकाच्या वास्तूचा बांधकाम नकाशा तयार केला होता. महात्मा गांधी यांच्या चरख्याप्रमाणे या स्मारकाची गोलाकार रचना आहे.