यवतमाळात हे काय घडतंय? पुन्हा सहा बालविवाहांचा घाट !
By अविनाश साबापुरे | Published: May 17, 2024 04:41 PM2024-05-17T16:41:45+5:302024-05-17T16:42:09+5:30
जिल्हा बालसंरक्षण कक्षाने थांबविले : नवरी-नवरदेव दोघेही अल्पवयीन
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बालविवाहांची लाट आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच शुक्रवारी एकाच दिवशी सहा बालविवाहांचा घाट घालण्यात आला होता. सुदैवाने बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने ऐनवेळी धडक देऊन हे सहाच्या सहा बालविवाह रोखले. विशेष म्हणजे, यातील चार विवाहांमधील नवरीसह नवरदेवही अल्पवयीन असल्याची बाब कार्यवाहीत पुढे आली.
यवतमाळपासून अंतराने दूर असलेल्या झरीजामणी तालुक्यात एक तर राळेगाव तालुक्यात होणाऱ्या पाच बालविवाहांचा यात समावेश आहे. झरीतील माथार्जुन तर राळेगावमधील आठमुर्डी, भूलगड, सावनेर व वलीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात शुक्रवारी सहा बालविवाह लागणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे राळेगाव व झरी जामणी तालुक्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच राळेगाव व झरी जामणी पोलिस ठाणे, आठमुर्डी, भूलगड, सावनेर, वलीनगर व माथार्जुन येथील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, गाव बालसंरक्षण समिती यांना तातडीने माहिती देण्यात आली. या पथकांनी तेवढ्याच तत्परतेने संबंधित गावांना भेटी दिल्या. आठमुर्डी, भूलगड, सावनेर व वलीनगर येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार, चाईल्ड लाईनचे फाल्गुन पालकर, दिव्या दानतकर, पूनम कन्नाके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. आठमुर्डी, भूलगड, सावनेर व वलीनगर या गावातील मुलगा व मुलगी हे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली.
गाव बाल संरक्षण समितीच्या उपस्थितीत सहाही बालविवाह थांबविण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन नवरी-नवरदेवांच्या पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविण्यात आले. सर्वांना बाल कल्याण समितीपुढे हजर होण्याचे सूचनापत्र देण्यात आले.
बालविवाह थांबविण्याची ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, परीविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राळेगावचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विटाळकर, झरी जामणीचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पांडे, दोनही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी राणे व ठाकरे आदींनी पार पाडली.