यवतमाळात क्रिकेट सट्टा-बुकी नाहीत काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:40 PM2019-04-29T21:40:17+5:302019-04-29T21:40:40+5:30
आयपीएल क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर वणी पोलिसांनी लागोपाठ दोन धाडी यशस्वी केल्या असताना जिल्ह्यात यवतमाळसह इतरत्र कुठेच अशी कारवाई का दिसत नाही, यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, दारव्हा या भागात क्रिकेट सट्टा नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आयपीएल क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर वणी पोलिसांनी लागोपाठ दोन धाडी यशस्वी केल्या असताना जिल्ह्यात यवतमाळसह इतरत्र कुठेच अशी कारवाई का दिसत नाही, यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, दारव्हा या भागात क्रिकेट सट्टा नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात आयपीएल क्रिकेटवरील दोन धाडी गेल्या आठवड्यात पाठोपाठ यशस्वी झाल्या. तेथे रोकड कमी सापडली असली तरी वाहने, मोबाईल, लॅपटॉप यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सट्टा लावणाऱ्यांनाही अटक करण्यात आली. वास्तविक अशीच धुमधडाका कारवाई यवतमाळात अपेक्षित आहे. कारण यवतमाळ हे आयपीएल क्रिकेट सट्ट्याचे प्रमुख केंद्र मानले जाते. मार्इंदे चौक, नेहरु चौक, पांढरकवडा-भोसा रोड परिसर, महादेव मंदिर येथे प्रमुख बुकींचे संपर्क आहेत. यातील एक चक्क लोकप्रतिनिधी आहे. तेथूनच क्रिकेट सट्ट्याचे सर्वदूरपर्यंत नेटवर्क चालविले जाते. अलिकडे सावधगिरी म्हणून पांढरकवडा रोडवरील एका कृषीच्या दुकानात सर्व कलेक्शन केले जाते. तेथून त्याचा हिशेब ठेवला जातो. त्यामुळे हे कृषीचे दुकान क्रिकेट सट्ट्याचे मुख्य केंद्र बनले आहे. विशेष असे, या सर्व बुकींची बैठक-कार्यालये पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यानंतरही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. पोलीस यंत्रणेतील अनेक अधिकारी या क्रिकेट बुकींच्या दावणीला बांधले असल्याची माहिती आहे. त्यामुळे धाडी घालाव्या कुणी असा प्रश्न निर्माण होतो. एका तरुण फौजदाराने महिनाभरापूर्वी गांधी चौक परिसरात धाड घातली. त्यात गुन्हा दाखल होऊन कारवाईही झाली. या कारवाईत एका बड्या क्रिकेट बुकीचे नाव पुढे आले होते. त्या फौजदाराने या बुकीवर कारवाईची तयारीही चालविली होती. मात्र त्यांच्या शहरातील वरिष्ठांनी या फौजदाराचीच ‘राजूकडे धाड का घातली’ म्हणून झाडाझडती घेतल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते.
आयपीएल क्रिकेटचे आता अवघे १५-२० सामने शिल्लक आहेत. मात्र हे सर्व सामने महत्वाचे आहे. त्यामुळे या प्रत्येक सामन्यावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्टा लावला जाणार आहे. तेथील उलाढालही कोट्यवधी रुपयांची होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी खाकी वर्दीतूनच या क्रिकेट अड्ड्यांना व तेथील क्रिकेट बुकींना खुले संरक्षण दिले जात असल्याचे चित्र आहे. वणी पोलीस क्रिकेटवरील धाडी यशस्वी करू शकतात तर जिल्ह्याचे मुख्यालय व वरिष्ठांचे तळ असलेल्या यवतमाळ पोलिसांना ते का शक्य होऊ नये, असा सवाल उपस्थित केला जातोय.
भूखंड घोटाळ्यातही सहभाग उघड
आयपीएल क्रिकेट व काही बुकींचा यवतमाळात ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या कोट्यवधींच्या भूखंड खरेदी घोटाळ्यातही सहभाग आढळून आला आहे. मात्र पोलिसांचे पक्के सुरक्षा कवच लाभल्याने हे बुकी अद्याप रेकॉर्डवर आलेले नाही. न्यायालयात तारीख पेशीवर यातील आरोपीला आणले असता अलिकडेच त्याच्या पित्याने या भूखंड घोटाळ्यामागील खरे वास्तव उघड केले. क्रिकेट बुकींमुळेच हा घोटाळा घडल्याचेही सांगितले जाते. या बुकींनी क्रिकेट सट्ट्यापायी आपले आर्णी रोडवरील एका हॉटेल मागे असलेले शेत हडपल्याची आपबिती या पित्याने उपस्थितांपुढे कथन केली होती. घोटाळ्याचे कर्तेधर्ते असूनही अद्याप हे बुकी मोकळे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.