अमृत योजनेच्या कामावर विरोधी पक्ष गप्प का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:57 PM2019-05-17T21:57:03+5:302019-05-17T21:57:51+5:30
बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. असे असताना या बेंबळाच्या पाण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच नेहमी छुटपुट मुद्यावर आंदोलन करणारे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय संघटना काही एक बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचवेळी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये या बघ्याची भूमिका घेणाऱ्यांविरोधात तीव्र असंतोषही धुमसत आहे.
निळोणा व चापडोह धरणावरुन यवतमाळ शहराची तहान भागू शकत नाही म्हणून बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळकरांसाठी पाणी आणण्याचा निर्णय झाला. त्यासाठी अमृत योजनेतून २७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ठरल्याप्रमाणे आॅक्टोबर २०१९ ला बेंबळाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार होते. परंतु घाईघाईने २०१८ ला या कामाचे उद्घाटन करून उन्हाळ्यापूर्वी पाणी आणण्याची घोषणा सत्ताधारी पक्षाने केली. बेंबळाचे पाणी येणार, भटकंती थांबणार म्हणून नागरिकही सुखावले. परंतु प्रत्यक्षात यवतमाळकरांचा भ्रमनिरास झाला. सलग दुसरा उन्हाळा संपायला आला तरी बेंबळाच्या पाण्याचा पत्ता नाही.
बेंबळाचे पाणी नियोजित वेळेपूर्वी यवतमाळात न्यायचे म्हणून वेगवान पद्धतीने पाईपचा पुरवठा केला गेला. त्या गोंधळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या पाईपच्या दर्जा व गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले. तातडीने पाईप द्यायचे आहे म्हणून कदाचित पुरवठादार कंपनीनेही या पाईपच्या दर्जावर लक्ष दिले नसावे. अखेर पहिल्याच टेस्टींगमध्ये या पाईपची गुणवत्ता उघडी पडली. त्यातील भ्रष्टाचाराची उघड चर्चा होऊ लागली. निकृष्ट पाईपमुळे या योजनेच्या कामाचा बराच महत्वाचा अवधी निघून गेला. आता पाच महिन्यांवर या योजनेची डेड लाईन आली आहे. सध्याची संथगती पाहता वेळेत ही योजना पूर्ण होईल, असे दिसत नाही. राजकीय श्रेयासाठी सत्ताधाºयांनी घाईगडब केल्यानेच या योनजेच्या पूर्णत्वाला विलंब होत असल्याचे सांगितले जाते.
बेंबळावरून पाणी आणण्याच्या २७७ कोटींच्या या योजनेत सुमारे वर्षभरापासून बराच गोंधळ सुरू आहे. पाईपची निकृष्टतता व त्यातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. परंतु त्यानंतरही विरोधी बाकावर असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्ष, संघटना या मुद्यावर काही एक बोलत नसल्याने त्यांच्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. विरोधक शांत असल्यानेच बेंबळाच्या पाण्याला विलंब होऊनही सत्ताधारी मंडळी अगदी निश्चिंत आहेत. विरोधी नेतृत्वच पुढाकार घेत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जनतेलाही नाईलाजाने शांत रहावे लागत आहे.
अपेक्षाभंगाचा सत्ताधाºयांना फटका
सत्ताधाºयांनी बेंबळाचे पाणी नियोजित वेळेच्या एक वर्षआधी आणण्यासाठी आग्रह धरल्यापासूनच या योजनेला ग्रहण लागले. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन राजकीय लाभ मिळेल, असा सत्ताधाºयांचा लवकर पाणी आणण्यामागे हेतू होता. मात्र प्रत्यक्षात पाणीच न आल्याने हा हेतू साध्य झाला नाही. उलट अपेक्षा दाखवून प्रत्यक्षात त्याची पूर्तता न केल्याने जनतेत रोष निर्माण झाला. त्याचा राजकीय फटका सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.