जिनिंगच्या मूल्यांकनातच तफावत, बेभाव लिलावावर राजकीय पक्ष गप्प का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:54 AM2017-11-21T04:54:38+5:302017-11-21T04:54:51+5:30
यवतमाळ सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीची सुमारे २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जमीन अवघ्या सात कोटीत विकली जात आहे.
यवतमाळ : यवतमाळ सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीची सुमारे २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जमीन अवघ्या सात कोटीत विकली जात आहे. या जिनिंगच्या मूल्यांकनातही प्रचंड तफावत आढळून आली आहे. धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंगच्या आठ एकर जमिनीची किंमत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्हॅल्युअरने दहा कोटी निश्चित केली आहे. दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयाने रेडीरेकनरनुसार जमिनीचे मूल्यांकन साडेआठ कोटी नोंदविले. तर सरकारी व्हॅल्यूअरने ही किंमत १३ कोटी सांगितली आहे. प्रत्यक्षात रियल इस्टेटमधील ब्रोकर्सच्या अंदाजानुसार २४ कोटी आहे. त्यामुळे नेमकी किंमत किती याचा संभ्रम निर्माण
झाला असून हे मूल्यांकनही मॅनेज केल्याचा संशय आहे. वणी येथील वसंत सहकारी जिनिंगचा चार वर्षांपूर्वी लिलाव झाला असता सात एकर जमिनीला तब्बल २१ कोटी रुपये मिळाले होते, हे विशेष.
>बँकेचे अध्यक्ष भाजपाचे, संचालक काँग्रेस-राष्ट्रवादीचे
सहकारी जिनिंगच्या जमिनीच्या लिलावात भाजपाकडे अध्यक्षपद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वाची भूमिका वठविली आहे. आपल्या साडेसहा कोटींच्या कर्जवसुलीच्या आड या जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया अत्यंत छुप्या पद्धतीने राबविली गेली. त्यामुळेच बँकेच्या संचालक मंडळाकडे संशयाने पाहिले जात आहे. सहकारी जिनिंगच्या जमिनीची बेभाव विक्री होत असताना सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच विरोधी बाकावरील काँग्रेस व राष्टÑवादीने अद्याप ‘ब्र’सुद्धा काढला नाही. ते पाहता या पक्षांचा तर या व्यवहाराला पाठिंबा नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेवर गेली कित्येक दशके काँग्रेस व राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. सध्याही बहुतांश याच पक्षांचे संचालक आहेत. तीन संचालकांच्या बळावर बँकेचे अध्यक्षपद भाजपाकडे आहे.
>आणखी २२ एकर जागेवर नजर
यवतमाळ सहकारी जिनिंगच्या मागील बाजूला २२ एकर जागा आहे. शासनाने ती यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली आहे. या जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा आहे. त्यासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ काही काळापुरते का होईना हटविणे, तेथे प्रशासक बसविणे व त्या माध्यमातून आपल्या सोईचे पत्रव्यवहार करून घेणे, पुढे या जागेचा वापर आपल्या सोईने बदलवून लिज मिळविणे, असा या सत्ताधारी बिल्डर लॉबीचा अजेंडा असल्याचे सांगितले जाते.