कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:09 AM2020-09-25T09:09:55+5:302020-09-25T09:11:39+5:30
अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता आहे. त्यासाठी सर्वच जण शक्य त्या उपाययोजना करण्यास तयार आहे. जनमानसातील कोरोनाची भीती ओळखून ती कॅश करण्याकरिता अनेक उत्पादने बाजारात आली आहे. त्याचे फायदेही तितक्याच सराईत पणे पटवून दिले जात असल्याने अनेक जण त्याला खरेदी करण्यासाठी धडपडत आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे. त्यासाठी न्यू व्हायरस शटआऊट असे लॉकेट गळ्यात घातल्यास तीन फुटाच्या परिघात कोरोनाचा विषाणू जिवंत राहत नसल्याचे सांगितले जात आहे. या न्यू व्हायरस शटआऊट लॉकेटची किंमतही हजाराच्यावरच आहे. अनेक जण आता हे लॉकेट गळ्यात घालून फिरताना दिसत आहे.
घरातील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी अल्ट्राव्हायलेट लाईटचा प्रयोग केला जात आहे. मात्र अनेक जण हा प्रयोग मानवी शरीरासाठी घातक असल्याचे सांगतात. हा लाईट घरातील एका खोलीत काही मिनिट लावून ठेवल्यास तेथील सर्व प्रकारचे व्हायरस नष्ट होतात, असा दावा केला जात आहे. तर निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली अल्ट्राव्हायलेट लाईट खासगी कार्यालयातील टेबल खुर्च्यांवरून फिरविला जात आहे. या उत्पादनाची किंमतही पाच हजारांच्यापुढेच आहे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे असे अनेक जण या उत्पादनाची खरेदी करताना दिसत आहे. अल्ट्राव्हायलेट सारखे घातक किरणे उत्सर्जित करणारी उत्पादने बाजारात कुठल्याही निर्बंधाशिवाय विकली जात आहे. याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अतिनील किरणे मानवी शरीरावर पडल्यास त्यातून कॅन्सरसारखा दुर्धर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोना नियंत्रणासाठी असलेली उत्पादने विकणाऱ्या कंपन्या अनेक दावे करीत आहे. त्याचे मार्केटिंग प्रतिनिधी उत्पादनाची माहिती देताना दिसतात. या दाव्यांना शास्त्रीय आधार काय हे मात्र कुणीच सांगायला तयार नाही. जनमाणसातील कोरोनाच्या भीतीला काही उत्पादकांनी संधी बनविल्याचे दिसून येते. याची शासकीय यंत्रणेने दखल घेण्याची गरज आहे.
आधी काढ्यावर भर, नंतर दिसले दुष्परिणाम
कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा वाढत असून रुग्णसंख्या साडेसात हजारांच्यापुढे गेली आहे. मृतांचाही आकडा वाढतो आहे. आता प्रत्येकालाच स्वत:सह कुटुंबाची चिंता सतावत आहे. कोरोना होऊच नये, त्याला प्रतिबंधक करावा यासाठी सुरुवातीच्या काळात आयुर्वेदातील उपचार, काढा, याशिवाय दैनंदिन वापरातील खाद्य पदार्थ यावर भर दिला जात होता. शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी काढ्याचा प्रयोग अनेकांनी केला. त्याचे कमी जास्त प्रमाणात दुष्परिणामही जाणवले. मालेगाव काढा तर राज्यात प्रसिद्ध झाला होता. नंतर त्याचे अतिसेवनाने काय परिणाम झाले हेही वास्तव सर्वश्रृत आहे.