आमदार-खासदारांनी कुठलाही निर्णय घेतला तरी आम्ही सेनेसोबतच; पदाधिकाऱ्यांना पाठविले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 06:10 PM2022-06-23T18:10:03+5:302022-06-23T18:40:44+5:30
आमदार, खासदार वेगळ्या गटात जाऊन पक्ष प्रमुखांनाच आव्हान देऊ पाहत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
यवतमाळ : मागील दोन दिवसांपासून शिवसेनेत राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेचे पुढे काय होणार असा प्रश्न उभा असतानाच आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. जिल्ह्यातील आमदारांनी व खासदारांनी अगदी कोणीही कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही तीनही जिल्हा प्रमुख शिवसेना व पक्ष प्रमुखांसोबत ठाम असल्याचे स्पष्ट करीत संयम ठेवा, वरिष्ठांच्या पुढील निर्देशाची वाट पाहूया, असेही या पत्रात त्यांनी आवाहन केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकविल्यापासून जिल्ह्यातील शिवसैनिक अस्वस्थ आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी पुढे येऊन बोलत नसल्याने शिवसैनिकांची अस्वस्थता वाढत असताना गुरुवारी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी पदाधिकाऱ्यांना हे आवाहन केले आहे. सध्या सेनेत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार, खासदार वेगळ्या गटात जाऊन पक्ष प्रमुखांनाच आव्हान देऊ पाहत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यातील शिवसेना एकसंध ठेवणे हे पदाधिकाऱ्यांचे काम असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
विरोधी पक्षात गेलो तरी मिळून संघर्ष करू
जिल्ह्यातील शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षात गेलो तरी आपण सर्वजण मिळून संघर्ष करू आणि यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलानेच फडकवत ठेवू. सध्याची वेळ परीक्षेची आहे. आपापसातील मतभेद, महत्त्वाकांक्षा, जुने वाद-विवाद विसरून संघटितपणे सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाऊ, अशी विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे पदाधिकाऱ्यांना केली आहे.