सांडपाण्यावर गव्हाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:05 PM2018-12-23T22:05:05+5:302018-12-23T22:05:41+5:30
गावातील सांडपाण्यावरून भांडणे होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र याच पाण्याचा सदुपयोग करीत शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग बोरीअरबमधील शेतकऱ्याने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावातील सांडपाण्यावरून भांडणे होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र याच पाण्याचा सदुपयोग करीत शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग बोरीअरबमधील शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याने नदीपात्रातील मोकळ्या जागेवर सांडपाण्यातून गव्हाचे पीक उभे केले आहे. गावकऱ्यांपुढे आणि शेतकºयांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
दारव्हा मार्गावरील बोरीअरब गावातील अडाण नदीच्या पात्रात हा अभिनव प्रयोग परसराम बावने यांनी यशस्वी केला आहे. बोरीअरबमध्ये घरातील सांडपाणी नालीच्या माध्यमातून नदीपात्रात काढण्यात आले आहे. पूर्वी हे पाणी सरळ नदीपात्रात मिसळत होते. या नदीपात्राच्या काठावर थोडा चढ आहे. त्या ठिकाणी मशागत करून शेतकऱ्याने रान तयार केले. त्यात वाफे तयार करून गव्हाची पेरणी केली. या गव्हाच्या पिकाला गावातील सांडपाणी सोडण्यात आले. हा संपूर्ण भाग उताराचा असल्याने या ठिकाणी कुठल्याही मोटारपंपाचीही गरज भासत नाही. यातून संपूर्ण परिसर ओलित करता येतो. साध्या तंत्रातून करण्यात आलेले हे ओलित आज पिकांच्या रूपात बहरत आहे. यापूर्वी बावने यांनी भाजीपालाही काढला आहे. आता गव्हाची लागवड केली आहे. सांडपाण्यावर बहरलेले पीक पाहण्यासाठी प्रत्येक वाटसरु येथे थांबतोच.
गावागावांत व्हावा प्रयोग
सांडपाणी सर्वत्र पसरून दुर्गंधी पसरल्याचे चित्र बहुतांश गावात पाहायला मिळते. सांडपाणी गोळा करून त्यावर अशाच प्रकारची शेती अथवा बगीचा फुलविल्यास गटाराऐवजी शोभीवंत जागा आणि उत्पन्न देणारे पीक पाहायला मिळेल. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे मत बोरीअरबचा प्रयोग पाहणारा प्रत्येक जण व्यक्त करतो.