वणीत एसटी बसची चाके खोळंबूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:34+5:30
कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात आली. मात्र २२ मेपासून पुन्हा एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली. प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंडळाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : राज्यात झालेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावाचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. गेल्या सहा दिवसांपासून बससेवा सुरू झाल्यानंतरही कोरोनाच्या भयाने प्रवासी एसटी बसचा प्रवास टाळत आहे. परिणामी वणी आगाराला त्याचा मोठा फटका बसत आहे. वणी आगारातून दररोज तीन टक्के बसफेऱ्या होत आहेत.
कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात आली. मात्र २२ मेपासून पुन्हा एसटी महामंडळाची बससेवा सुरू झाली. प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंडळाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. बसमध्ये प्रवाशांना बसविण्याअगोदर संपूर्ण बस स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर बस सॅनिटाईझ केली जाते. प्रवासी बसमध्ये शिरताच, त्यांच्या हातावरदेखील सॅनिटाइझर दिले जात आहे. फेरी करून परतल्यानंतरदेखील बस पुन्हा स्वच्छ धुवून सॅनिटाईझ केली जात आहे. महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची अशी काळजी घेतली जात असली तरी, प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र वणीत पहायला मिळत आहे.
२२ मेपासून बससेवा सुरू केल्यानंतर यवतमाळ, राळेगाव, मुकुटबन व पांढरकवडा याच मार्गावर बसच्या अगदी मोजक्या फेºया होत आहेत. गेल्या सहा दिवसांत केवळ ४४८ प्रवाशांनी महामंडळाच्या बसमधून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला केवळ २९ हजार ४९ रुपयांचे उत्पन्न झाले. सहा दिवसांत वणी आगारातून बसच्या ३६ फेºया झाल्या.
एरव्ही दर उन्हाळ्यात वणीचे बसस्थानक गर्दीने फुलून असायचे. परंतु लॉकडाऊननंतर या परिसरात स्मशानशांतता पहायला मिळाली. सध्या शाळा, कॉलेज, लग्न समारंभ, धार्मिक उत्सव आदींवर बंदी असल्यानेदेखील प्रवाशांचे आवागमन बंद आहे. महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्यासाठी ही बाबदेखील कारणीभूत आहे. उन्हाळ्यातील लग्नसराईचा मोठा फायदा महामंडळाला होतो.