१६ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदारकी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:25 PM2018-08-03T12:25:26+5:302018-08-03T12:28:30+5:30
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ हजारांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी आता महासंचालकांकडे नवा पर्यायवजा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ‘एनपीसी’ अर्थात नायक पोलीस कॉन्स्टेबल हे पद रद्द करून त्या पदाला थेट फौजदारकीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खात्यांतर्गत फौजदार पदासाठी परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या अनेक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ हजारांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी आता महासंचालकांकडे नवा पर्यायवजा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ‘एनपीसी’ अर्थात नायक पोलीस कॉन्स्टेबल हे पद रद्द करून त्या पदाला थेट फौजदारकीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे.
सन २०११ ते २०१३ या सलग तीन वर्ष फौजदारपदी बढतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा घोषित करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ती घेतली गेली नाही. २०१३ अखेर ही परीक्षा घेण्यात आली. दहा वर्षे सेवा झालेले सर्व पोलीस शिपाई ते एएसआय या परीक्षेस पात्र होते. २५ हजार ६६६ पोलिसांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३८४ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यातील दोन हजार ४७५ उमेदवारांना आतापर्यंत फौजदारपदी नियुक्ती दिली गेली. त्या यादीतील १६ हजार ९०९ पोलीस कर्मचारी अद्यापही फौजदार पदावरील नियुक्तीपासून वंचित आहे. खात्यांतर्गत परीक्षेसाठी असलेला २५ टक्के जागांचा कोटा लक्षात घेता या १६ हजार कर्मचाऱ्यांना आणखी किती तरी वर्षे फौजदारकीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणून या उमेदवारांमधूनच नवीन प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार नायक पोलीस कॉन्स्टेबल (एनपीसी) हे पद रद्द करावे आणि त्याऐवजी या पदाचा दर्जा थेट फौजदारकीचा करावा, असा हा प्रस्ताव आहे. हे करीत असताना शासनाच्या तिजोरीवर फारसा ताण पडणार नाही. कारण बहुतांश पोलीस कर्मचारी हे पोलीस नायक पदाचे वेतन घेत आहे. त्यांना पदोन्नती दिल्यास केवळ ग्रेड-पेमध्ये वाढ होऊन १५०० ते १९०० रुपये इतकाच वेतनाचा भार पडणार आहे. मात्र त्या बदल्यात किमान १६ वर्षे सेवा पूर्ण झालेला दीर्घ अनुभवी पोलीस अधिकारी खात्याला तत्काळ उपलब्ध होणार आहे. शिवाय आधीच अनुभव असल्याने प्रशिक्षण तथा परिविक्षा कालावधीची दोन वर्षे व त्यावरील खर्च वाचणार आहे.
पाच वर्षात केवळ १२ टक्के नियुक्त्या
२०१३ ते २०१८ या पाच वर्षात खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या केवळ दोन हजार ४७५ उमेदवारांना फौजदारपदी नियुक्ती दिली गेली. ही टक्केवारी केवळ १२.७६ एवढी आहे. महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीत १६ हजार २५६ उमेदवार फौजदार पदावरील बढतीसाठी पात्र ठरतात. मात्र खात्यांतर्गत फौजदारांच्या मंजूर पदांची संख्या केवळ २२४२ एवढी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र उमेदवारांना फौजदार बनण्यासाठी आणखी किती काळ लागणार याचे उत्तर महासंचालक कार्यालयाकडे नाही.