जरा हटके; सफाई कर्मचारी जेव्हा मुख्याधिकारी बनला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:25 PM2019-10-02T12:25:58+5:302019-10-02T12:28:46+5:30
घाटंजी नगरपालिकेतील. प्रदीप महिपाल बिसमोरे या कर्मचाऱ्याच्या कृतार्थ निवृत्तीची ही गोष्ट. ३० सप्टेंबरला ते ४० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बिसमोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. मात्र, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी बिसमोरे यांना आपल्या कक्षात नेऊन चक्क आपल्या खुर्चीवर बसवून त्यांचा सत्कार केला.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नालीमध्ये फावडे टाकून घाण ओढणे, रस्त्यावरचा केर काढणे, गावातल्या मृत जनावरांची विल्हेवाट लावणे... एवढे वाचूनही अनेकांनी नाकाला रुमाल लावले असतील. पण दररोज हीच कामे मन लावून करणारे सफाई कर्मचारी कसे जगत असतील? त्यांना दुर्गंध जीवघेणा वाटत नसेल का? त्यांनाही त्रास होतोच, पण ते गावाच्या स्वच्छतेसाठी दुर्गंधीचे, घाणीचे हलाहल स्वत:वर ओढवून घेतात. असाच एक कष्टिक सफाई कामगार सोमवारी चक्क मुख्याधिकारी बनला..!
होय, ही गोष्ट आहे घाटंजी नगरपालिकेतील. प्रदीप महिपाल बिसमोरे या कर्मचाऱ्याच्या कृतार्थ निवृत्तीची ही गोष्ट. ३० सप्टेंबरला ते ४० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बिसमोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. मात्र, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी बिसमोरे यांना आपल्या कक्षात नेऊन चक्क आपल्या खुर्चीवर बसवून त्यांचा सत्कार केला. ‘आज तुम्ही एक दिवसाचे मुख्याधिकारी’ अशा शब्दात त्यांचा सन्मान केला. ज्या कार्यालयात आपण चतुर्थश्रेणीपेक्षाही खालच्या स्तरावरचे काम केले, त्याच कार्यालयात निवृत्तीच्या दिवशी सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा हा प्रसंग अनुभवताना बिसमोरे यांचे काळीज गहिवरून गेले.
प्रत्येक महिन्यात दोघांचा सत्कार
घाटंजी पालिकेत सफाई कामगारांच्या सन्मानाची अनोखी परंपरा निर्माण करण्यात आली आहे. दरमहिन्यात दोन कामगारांचा मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वांपुढे सत्कार केला जातो. यात एक महिला तर एक पुरुष कामगार निवडला जातो. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर्वत्र स्वच्छतेचा जागर होत असताना घाटंजीतील हा दैनंदिन उपक्रम लाखमोलाचा ठरणारा आहे.
प्रदीप बिसमोरे यांनी ४० वर्ष कुठलीही तक्रार न करता अखंडपणे शहर स्वच्छतेसाठी सेवा दिली. लोकांना अधिकारी म्हणून आम्ही दिसत असलो, तरी शहरासाठी झटणारे खरे हात या कामगारांचेच असतात. म्हणून निवृत्तीच्या दिवशी आम्ही त्यांना एक दिवसासाठी मुख्याधिकारी होण्याचा सन्मान बहाल केला. पालिकेतील वर्ग एक आणि दोनच्या कर्मचाऱ्यांना जेवढा सन्मान मिळतो, तेवढाच सन्मान सफाई कामगारांनाही मिळावा, हाच त्या मागचा हेतू आहे.
- पृथ्वीराज पाटील,
मुख्याधिकारी, घाटंजी