शिक्षणाधिकाऱ्यांचे हात जेव्हा दगडधोंडे उचलतात..!
By Admin | Published: May 23, 2017 01:20 AM2017-05-23T01:20:00+5:302017-05-23T01:20:00+5:30
अधिकाऱ्यांनी खुर्चीवरून आदेश द्यायचे आणि कर्मचाऱ्यांनी राबायचे... हाच शासकीय कार्यालयांचा शिरस्ता. पण कर्मचाऱ्यांनी हाक दिली ...
टंचाईविरुद्ध शिक्षक सरसावले : खैरगावात श्रमदानातून उभारले दोन बंधारे, वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अधिकाऱ्यांनी खुर्चीवरून आदेश द्यायचे आणि कर्मचाऱ्यांनी राबायचे... हाच शासकीय कार्यालयांचा शिरस्ता. पण कर्मचाऱ्यांनी हाक दिली आणि अधिकारी धावून आले, हा अपूर्व प्रसंग रविवारी खैरगावात अनुभवायला मिळाला. उन्हाळी सुटीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिक्षक सरसावले आणि त्यांच्या प्रोत्साहनासाठी शिक्षणाधिकारी पोहोचल्या. स्वत: हाती दगडधोंडे घेऊन बंधारा बांधला. अधिकारी-कर्मचाऱ्यांमधल्या ‘अंतरा’चा बंधारा तोडला!
यवतमाळ जिल्ह्यातील खेड्यांमध्ये ४४ अंशांचे तापमान आणि बादलीभर पाण्यासाठी घमासान, अशी भीषण स्थिती आहे. अशा १२६ खेड्यांनी आमीर खानच्या ‘वॉटर कप स्पर्धे’त भाग घेऊन श्रमदान सुरू केले आहे. गावकरी गावासाठी झटत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘सेलिब्रिटी’ येत आहेत. पाण्यासाठी परिस्थितीशी झुंजणाऱ्या खेडूतांसोबत आपणही श्रमदान केले पाहिजे, या विचारातून काही शिक्षक राळेगाव तालुक्यातील खैरगाव येथे रविवारी सकाळी साडेसहा वाजता पोहोचले. ही वार्ता कळताच प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनीही खैरगावात धाव घेतली. दिवसभर त्यांनी शिक्षक, गावकऱ्यांसोबत श्रमदान केले. विशेष म्हणजे, येथे दररोज श्रमदान करणाऱ्या योगीता भोयर आणि मयुरी घोटेकर या दोन विद्यार्थिनींसोबत त्या राबल्या.
जलसंवर्धनाच्या कामाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या गावातील तरुणांच्या मार्गदर्शनात श्रमदान करण्यात आले. गावालगतच्या टेकडीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे ठरले. शिक्षक आणि शिक्षणाधिकारी कामाला लागले. काहींनी टेकडीवरील मोठ-मोठे दगड खाली टाकायचे आणि दुसऱ्या चमूने ते गोळा करून बंधारा बांधायचा. दिवसभर चाललेल्या या श्रमातून खैरगावात दोन बंधारे उभे राहिले आहेत.
शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला गेला. यात शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, विक्रीकर निरीक्षक आनंद पाटेकर, हिमांशू पाटेकर, कार्तिक पाटेकर, परिषदेचे अध्यक्ष सतपाल सोवळे, सचिव गजानन पोयाम, कार्यालय मंत्री किशोर उईके, सुरेंद्र दाभाडकर, दिलीप कुडमेथे, मिलिंद सोळंके, रवींद्र वानखडे, उपसरपंच गजानन ढाले, ग्रामसेवक झिलपे, पाणी फाऊंडेशनचे बंडू खुळे, प्रकाश उरकुडे, स्वप्नील खुळे आदींनी श्रमदान केले.