एक लाख ७१ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार तरी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:55 IST2024-07-23T17:51:38+5:302024-07-23T17:55:23+5:30
धोरण बदलल्याचा फटका : शिलाई सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा

When One lakh 71 thousand students will get uniform?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरणाचा बार फुसकाच गेला. शालेय शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन आता २२ दिवसांचा कालावधी लोटला आहे. यंदा गणवेश धोरणात बदल करण्यात आला. याचा फटका विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत सोसावा लागत आहे. जिल्ह्यातील एक लाख ७१ हजार ५४४ इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिक्षणाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, जोडे आदी सुविधा देण्यात येतात. २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोनपैकी एक गणवेश शासनस्तरावरून तर दुसरा गणवेश स्थानिक पातळीवरून देण्याचे धोरण आखण्यात आले. येथूनच गोंधळाला सुरुवात झाली. पूर्वी गणवेशाचे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीकडे यायचे आणि गणवेश खरेदी करून त्याची रक्कम दुकानदाराच्या खात्यावर अदा करण्यात येत होती. नवीन बदलानंतर कंत्राटदाराकडून शाळा सुरू झाल्यावरही कापडाच्या कटिंगचा पुरवठा करण्यात आला नाही. आता कापडाचे कटिंग प्राप्त झाले असून, महिला विकास व आर्थिक महामंडळाच्या बचत गटाच्या वतीने त्याचे शिलाई काम सुरू असून, लवकरच वितरण होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. विद्यार्थ्यांना गणवेशासाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
११० रुपयांत शिवणार का?
स्काउट-गाइडचा दुसरा गणवेश हा स्थानिक पातळीवर बचत गटाच्या महिलांकडून शिवून घ्यायचा आहे. त्याचा कापड तालुकास्तरावर आला असून, तेथून शाळेत पाठविण्यात येणार आहे. हा गणवेश शाळा व्यवस्थापन समिती बचत गटाच्या महिलांकडून शिवून घेणार आहे. मात्र, त्यासाठी ११० रुपये शिलाईचे दर निश्चित करण्यात आले आहे. या कमी दरात खरोखरच शिवून मिळेल का, असा प्रश्नच आहे.
जोडे-मोज्यांच्या वितरणाचेही वांधे
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जोडे व मोजेही देण्यात येत आहेत. त्यासाठी १७० रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे अनुदानाची रक्कम गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यावर कधीच टाकण्यात आली. मात्र, कमी पैशात दर्जेदार जोडे व मोजे मिळण्याचेही वांधे आहेत.