भरधाव एसटीचे जेव्हा चाक निखळते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:00 AM2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:34+5:30
बस पुढे वेगाने धावत होती. अजिंक्यने लगेच दुचाकीने या बसचा पाठलाग केला. तोवर बस लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या पुढे निघून गेली होती. अजिंक्यने आपल्या दुचाकीचा वेग वाढवून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांच्या घरापुढे बसला आडवे होऊन बस थांबविली आणि बसचे चाक जोरजोरात हालत असल्याचे अजिंक्यने चालकाच्या लक्षात आणून दिले. तेव्हा चालकाचाही थरकापच उडाला. प्रवासी बसच्या खाली उतरले. सर्व प्रवाशांनी अजिंक्यचे मनापासून आभार मानले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथून निघालेल्या बसचे चाक काही वेळातच निखळून पडणार असल्याची बाब एका युवकाच्या लक्षात आली. त्याने प्रसंगवधान राखत बसचा पाठलाग करून काही अंतरावर बस थांबविली. त्यामुळे मोठा अपघात टळला. ही घटना रविवारी दुपारी वणी-वरोरा मार्गावर घडली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास वणी बसस्थानकावरून वणी ते चंद्रपूर ही वरोरामार्ग जाणारी बस वणी आगारातून निघाली. बसस्थानकाच्या बाहेर बस निघाल्यानंतर वेग वाढला. या बसच्या समोरचे डाव्या बाजूचे चाक जोरजोरात हालत होते. ही बाब चालक किंवा वाहकाच्याही लक्षात आली नाही. याचवेळी या रस्त्यावर काही कामानिमित्त उभ्या असलेल्या अजिंक्य शेंडे या युवकाच्या लक्षात ही बाब आली. बस पुढे वेगाने धावत होती. अजिंक्यने लगेच दुचाकीने या बसचा पाठलाग केला. तोवर बस लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या पुढे निघून गेली होती. अजिंक्यने आपल्या दुचाकीचा वेग वाढवून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांच्या घरापुढे बसला आडवे होऊन बस थांबविली आणि बसचे चाक जोरजोरात हालत असल्याचे अजिंक्यने चालकाच्या लक्षात आणून दिले. तेव्हा चालकाचाही थरकापच उडाला. प्रवासी बसच्या खाली उतरले. सर्व प्रवाशांनी अजिंक्यचे मनापासून आभार मानले. काही वेळातच वणी आगारातून दुसरी बस आली. त्या बसमध्ये हे सर्व प्रवासी बसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले. अजिंक्य शेंडे हा युवा सेनेचा उपजिल्हा प्रमुख असून सामाजिक कार्यात तो नेहमीच अग्रेसर असतो.