एसटीचा 37 हजार किलोमीटरचा प्रवास पुन्हा कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:24+5:30
कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, त्यासाठी एसटी महामंडळाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या अनेक एसटी बस धावत असताना मधेच बंद पडतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला कोरोनासह संपाचेही ग्रहण लागले आहे. यातून एसटीचा प्रवास कसाबसा सुरू झाला. मात्र, अजूनही ३७ हजार किलोमीटरचा प्रवास एसटीला गाठायचा आहे.
कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, त्यासाठी एसटी महामंडळाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या अनेक एसटी बस धावत असताना मधेच बंद पडतात. त्यातील बिघाड आणि विविध अडचणी याचा सामना महामंडळाच्या बस करीत आहेत. याशिवाय वेळ निश्चित नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहनानेदेखील प्रवास करीत आहेत.
खासगी प्रवासाने विद्यार्थी अडचणीत
- शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना टिकवून ठेवण्यासाठी मानव विकास मिशनच्या बसेस मोलाची भूमिका बजावून गेल्या आहे.
- या बसेसमध्ये विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेच्या वेळेवर पोहोचविण्यासाठी स्कूलबसप्रमाणे वापर होत होता.
- कोरोनानंतर या सगळ्या बसेस बंद पडल्या आणि विद्यार्थिनींचा आधारच तुटला.
- आता मानव विकासच्या बसेस कधी सुरू होणार याची प्रतीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे.
- खासगीतून प्रवास करताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
प्रवाशांची गैरसोय
दररोज ये-जा करताना एसटीचा वेळ निश्चित राहिलेला नाही. तासंतास थांबल्यानंतरही पुढे जाण्याची साेय राहात नाही. यामुळे खासगीनेच प्रवास करावा लागतो. यातून आर्थिक लूट होत आहे. परिवहन महामंडळाने याकडे जातीने लक्ष द्यावे.
- शंकर कसंबे, प्रवासी
दोन वर्षांपासून शाळेमध्ये जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन वर्ष संपले तरी मानव विकास मिशनच्या बसेस सुरू झाल्या नाही. आता कधी सुरू होणार माहिती नाही. असेच राहिले तर आमचे शिक्षणही अधांतरीच राहील.
- मीना सावळे, विद्यार्थिनी
नवनव्या उपाययोजना करण्यावर भर
एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रहदारीच्या रस्त्यांवर भर दिला आहे. शैक्षणिक सत्रात मानव विकासच्या बसेस सुरू होतील.
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक